Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

माहितीचा अधिकार दिनानिमित्त विभागीय आयुक्तालयात जनजागृती कार्यक्रम संपन्न



 

            अमरावती, दि. 03 :  माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 बाबत जनतेमध्ये व्यापक जनजागृती होण्यासाठी दरवर्षी ‘28 सप्टेंबर’ हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. तथापि, यावर्षी सन 2025ला माहिती अधिकार दिन हा शासकीय सुट्टीच्या दिवशी आल्यामुळे शासन निर्देशानुसार दि. 29 सप्टेंबर, रोजी माहिती अधिकार दिन विभागीय आयुक्त कार्यालयात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अधिकारी-कर्मचारी यांना माहितीचा अधिकार अंतर्गत महत्वाच्या तरतूदी व त्याअनुषंगाने जनजागृती करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्र.अपर आयुक्त रविंद्र हजारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

            कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शक म्हणून अॅड. राजेंद्र पांडे (यशदा, पुणे) यांना आमंत्रित करण्यात आले होते. अॅड. पांडे हे यशदा, भारती, महाराष्ट्र ज्युडिशियल अॅकेडमी, महाराष्ट्र पोलिस अॅकेडमी यांसारख्या संस्थांमध्ये मानद व अतिथी व्याख्याता असून, विविध महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये शासन व अपिलार्थीच्या वतीने युक्तीवाद करतात.

            यावेळी कार्यक्रमात ॲड. पांडे यांच्याव्दारे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती अधिकार कायद्याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. माहिती मागविण्याची प्रक्रिया, जन माहिती अधिकारी व सहाय्यक जन माहिती अधिकारी यांची कर्तव्य त्याचप्रमाणे अपिलीय अधिकारी, शासकीय उत्तरदायित्व याविषयी साध्या व सोप्या भाषेत त्यांनी माहिती दिली. सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची भूमिका, अभिलेख व्यवस्थापन आणि माहिती अर्जास सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या पद्धती यावर ॲड. पांडे यांनी सविस्तर प्रकाश टाकला.

            या कार्यक्रमाच्यावेळी ‘माहितीचा अधिकार क्यूआर कोड’चे विमोचन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व अध्यक्ष यांचे हस्ते करण्यात आले. सदर क्यूआर कोडच्या माध्यमातून नागरिकांना विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व शाखांची अद्ययावत माहिती उपलब्ध होणार आहे.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महसूल सहाय्यक पंकज कोंडे यांनी केले. सामान्य प्रशासन विभागाचे प्र. अपर आयुक्त रविंद्र हजारे यांनी अध्यक्षस्थान भुषविले. तर आभार प्रदर्शन महसूल सहाय्यक श्रीमती मनिषा ढोके, यांनी केले.


Post a Comment

0 Comments