अमरावती, दि. 4 (ग्रामीण उदय प्रतिनिधी ) : शासकीय नोकरीत असलेल्या घरातील कर्त्याचा अचानक मृत्यू झाला. अचानक झालेल्या या आघाताने पूर्ण कुटुंबाला आर्थिक विवंचनेत टाकले. मात्र अनुकंपाधारकांसाठी असलेल्या सोयीमुळे घरातील एकाला नोकरी मिळाली. त्यामुळे आता कुटुंबाची चिंता मिटली आहे, अशा भावना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळालेल्यांनी व्यक्त केल्या आहे.
अमरावतीतील जनैद खानला आईच्या निधनामुळे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली आहे. शासनाने अनुकंपा तत्वावरील नोकरीचे धोरण राबविण्यास सुरवात केली असल्यामुळे त्याला जिल्हाधिकारी कार्यालयातून बोलावणे आहे. त्याला अनुकंपाधारकांनी दाखल करावयाचे कागदपत्रे यांची माहिती देण्यात आली. त्यानंतर दि. 1 ऑक्टोबर रोजी त्याची कागदपत्रे पडताळणी झाली. अवघ्या काही दिवसांत म्हणजेच दि. 4 ऑक्टोबर रोजी त्याला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. आईच्या निधनामुळे कुटुंबियांची जबाबदारी आपल्यावर आली होती. आता नोकरीमुळे भविष्य सुरक्षित झाले असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
प्रणाली दहातोंडे यांचे वडील सामान्य रूग्णालयात कार्यरत होते. त्यांचा 2015 मध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती हालावली. त्यानंतर 4 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाधारकांकडून पसंतीक्रम घेण्यात आला. त्यानुसार प्रणाली दहातोंडेची नियुक्ती बांधकाम कामगार मंडळात नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबाच्या पालनपोषणाचा प्रश्न मिटला असल्याने प्रणाली दहातोंडे यांनी सांगितले.
अमरावतीतील फॉरेस्ट कॉलनी येथील रहिवासी सुमित वाघाळे यांनी शासनाने तातडीचा उपक्रम म्हणून अनुकंपाधारकांची नियुक्ती करण्याचे स्वागत केले. सुमितचे वडील वन विभागात वनपाल म्हणून कार्यरत होते. कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला होता. घरातील कर्त्या पुरूषाचा मृत्यू झाल्याने आर्थिक संतुलन बिघडले होते. शासनाने प्रदिर्घ कालावधीनंतर अनुकंपातत्वावरील नियुक्तीला गती दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुरवठा निरीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली आहे. त्यामुळे कुटुंब आणि लहान भावाचा सांभाळ करणे शक्य होणार आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे नियुक्ती मिळणे शक्य झाले असल्याने सुमित वाघाळे यांनी आभार व्यक्त केले.
मोर्शी येथील वैष्णवी दाभाडे हिचे वडील पोलिस दलात कार्यरत होते. त्यांचा 5 फेब्रुवारी 2017 रोजी मृत्यू झाला. कुटुंबात आई आणि बहिण होती. त्यांचा सांभाळ करणे कठिण काम होते. नोकरीची आवश्यकता असल्याने 4 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने पसंतीक्रम देण्यासाठी बोलाविले. अनुकंपाधारकांना तातडीने नियुक्ती मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रयत्न केले. त्यामुळे आरोग्य विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी वैष्णवी दाभाडे हिने शासनाचे आभार मानले.
Post a Comment
0 Comments