अमरावती दि. 03 : ऊर्जा संवर्धनाविषयी व्यापक जनजागृती होण्यासाठी सर्व शाळांमध्ये ‘ऊर्जा संवर्धन व अपारंपारिक ऊर्जा’ या विषयावर आधारित चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा राज्यस्तर व विभागस्तरावरील असून या दोन्ही स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांचा पारितोषिक देवून गौरव करण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाउर्जा विभागाच विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.
विभागातील सर्व शाळा प्रशासनाने चित्रकला व निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या गटानुसार व स्पर्धेच्या प्रकारानुसार स्थानिक समितीकडून प्रत्येकी तीन विजेत्यांची (प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक) निवड करून त्यांची नावे व निकालाची प्रत (रेखाचित्र व निबंध स्पर्धेची प्रत) महाराष्ट्र ऊर्जा विकास अधिकरण (महाऊर्जा) विभागीय कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती या कार्यालयास दि. 10 ऑक्टोबरपर्यंत सादर करावीत. त्यानंतर महाऊर्जा कार्यालयाकडून सदर निवड केलेल्या विद्यार्थ्यांची नावे राज्यस्तरीय स्पर्धेकरिता पाठविल्या जाईल.
स्पर्धेबाबत विशेषत:
सर्व शाळांनी इयत्ता 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थी गटासाठी ‘ऊर्जा वाचवा- पृथ्वी वाचवा काळाची गरज’ या विषयावर चित्रकला स्पर्धा घ्यावी. तसेच इयत्ता 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थी गटासाठी ‘ऊर्जा संवर्धन काळाची गरज’ व ‘जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी अक्षय ऊर्जा’ या विषयावर निबंध स्पर्धा घ्यावी. ‘सेवा पर्व’ कालावधीत सर्व शाळांनी ऊर्जा संवर्धन व अपारंपारिक ऊर्जा विषयक जनजागृती कार्यक्रम राबवावे.
स्पर्धेतील विजेत्यांचा महाऊर्जा विभागीय कार्यालयाद्वारे प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात येईल. या स्पर्धेत राज्यस्तरावर व विभागस्तरावर विजेत्या ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वाटप करण्यात येतील. या स्पर्धेच्या समन्वयासाठी महाऊर्जा विभागाचे जिल्हा व्यवस्थापक विजय काळे (मो. नं. 9561116226) तसेच प्रकल्प अधिकारी हर्षल काकडे (मो.नं. 9764475764) यांची नेमणूक करण्यात आली असून अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी यांच्याशी संपर्क साधावा, असे महाऊर्जा विभागाद्वारे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments