अमरावती, दि. ७ : अमरावती शहरातील कॅम्प परिसरात थॉमस चर्चजवळ एक मादी बिबट पिल्लासह निदर्शनास आली आहे. सदर परिसर दाट लोकवस्तीचा असून या भागात शाळादेखील आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षिततेची आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
शहरातील बिबटाच्या वावरावर वन विभाग, पोलिस व जिल्हा प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. तसेच नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सकाळी लवकर व संध्याकाळी उशिरा एकटे जाणे टाळावे, लहान मुलांना घराबाहेर एकटे खेळू देऊ नये, पाळीव जनावरे, विशेषतः कुत्री, बोकड व कोंबड्या, रात्री सुरक्षित ठिकाणी ठेवावी, बिबट दिसल्यास त्याला त्रास देऊ नये, दगडफेक करू नये किंवा हुसकावण्याचा प्रयत्न करू नये, बिबट दिसून आल्यास त्वरित वन विभागाच्या हेल्पलाईनवर 1926 किंवा 77680 38884 किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावे.
शाळांनी शाळेच्या आवारातील सर्व दरवाजे बंद ठेवावीत, विद्यार्थ्यांना गटानेच हलवावे व शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखालीच बाहेर ने-आण करावी, सक्तीचे कार्यक्रम, मैदानावरील सभा, खेळ सध्या टाळावेत, पालकांना परिस्थितीबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना आणते-नेतेवेळी विशेष दक्षता घ्यावी.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवा पसरवू नये किंवा घाबरून जाऊ नये, वन विभागाची पथके घटनास्थळी कार्यरत असून सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, सर्वांच्या सहकार्यामुळे ही परिस्थिती लवकर हाताळता येईल, असे उपवनसंरक्षक अर्जुना के. आर. यांनी कळविले आहे.
Post a Comment
0 Comments