एकाच दिवशी ४०० जणांना नियुक्तीचे आदेश
*लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा
अमरावती, दि. ७ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची नियुक्ती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड करण्यात आलेल्या लिपिक-टंकलेखक पदावरील ४०० उमेदवारांना दि. ४ ऑक्टोंबर ला एकाच दिवशी नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. संत ज्ञानेश्वर सभागृहात हा भावपूर्ण कार्यक्रम पार पडला. यावेळी उपस्थित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी अशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, वनसंरक्षक अर्जुना के. आर., आदिवासी विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी, पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल यांनी, शासनाने अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचे नियम सोपे केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर यातील नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यात साधारणतः ४०० जणांना, तर अमरावती विभागात ११०० उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती होण्यासाठी सर्व विभागांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगला. तसेच सक्रीय योगदान दिल्यामुळे नियुक्त्या करणे सफल झाले आहे. अनुकंपा तत्त्वावरील उमेदवार चांगल्या पद्धतीने लोकाभिमुख कामे करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, शासनाने दीडशे दिवसाच्या उपक्रमांमध्ये अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती हा उपक्रम घेतल्याने असंख्य उमेदवारांना फायदा झाला आहे. अनुकंपा तत्वांमध्ये दावा करण्यासाठी आता तीन वर्षे मुदत आणि उमेदवार बदलण्याची सोय देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक उमेदवार पात्र ठरले आहेत. शासन सेवेत आल्यानंतर आता प्रत्येकाने कर्तव्याप्रति संवेदनशील राहावे. एक चांगला अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारावी. नियुक्तीनंतर संवेदनशीलपणे कार्य करून पुढे जावे, असे सांगितले.
यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, रवी राणा, सुलभा खोडके, प्रताप अडसड, प्रवीण तायडे यांनी शासन सेवेत नियुक्ती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबई येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
यावेळी वन विभागात नवनियुक्त कर्मचारी ज्योती कोरडे आणि पोलीस विभागातील धनश्री टेकाम यांनी मनोगत व्यक्त केले. निरीक्षण अधिकारी चैताली यादव यांनी सूत्रसंचालन केले निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी आभार मानले.
Post a Comment
0 Comments