१५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदी केंद्र सुरू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, October 8, 2025

१५ ऑक्टोबरपासून कापूस खरेदी केंद्र सुरू



*कपास किसान ॲपवर नोंदणी आवश्यक

अमरावती, दि. ९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : यावर्षीच्या हंगामात भारत कापूस महामंडळाकडून कापूस खरेदी होणार आहे. यासाठी जिल्ह्यात 14 केंद्र दि. 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. किमान आधारभूत दराने कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना कपास किसान ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत या ॲपवर नोंदणी करता येणार आहे.

यावर्षीच्या हंगामात किमान आधारभूत किंमतीत भारत कापूस महामंडळाकडून खरेदी करण्यासाठी कपास किसान मोबाईल ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना कापूस खरेदीसाठी वेळ आणि तारीख निश्चित केली जाणार आहे. निश्चित केलेल्या वेळेत कापसाची खरेदी होणार आहे. हे ॲप शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार सात दिवसांच्या रोलींग आधारावर स्लॉट बुकींग करण्याची सुविधा देणार आहे. या डिजीटल उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन कोणत्याही अडचणीशिवाय विकण्याची सुविधा निर्माण झाली आहे.

कापूस महामंडळात नोंदणी करतेवेळी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर येणाऱ्या ओटीपीची आवश्यकता राहणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपला मोबाईल आधार कार्डशी लिंक केल्याची खात्री करावी किंवा जो मोबाईल नंबर आधीच आधार कार्ड सोबत लिंक आहे तोच द्यावा. कापूस विक्री अगोदर शेतकऱ्यांना कपास किसान अॅपमध्ये आपल्या आधारकार्डची प्रत, सातबारा, आठ अ सोबत फोटोसह कपास किसान अॅपमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर कापूस विक्रीसाठी स्लॉट बुकींग करून कापूस विक्रीसाठी आणता येणार आहे.

महामंडळातर्फे शेतकऱ्यांकडून थेट कापूस खरेदी केली जाणार आहे. कापूसाची रक्कम फक्त शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्यापूर्वी त्यांचे बचत खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक केल्याची खात्री करावी.

कपास किसान ॲप आणि कापूस विक्री दरम्यान कोणत्याही अडचणीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहिर करण्यात आले आहे. या क्रमांकावर शेतकरी आणि केंद्रचालक समस्यांचे निराकरण करू शकतील. शेतकऱ्यांनी 8897181111, 8897281111, 8897381111, 8897481111, 8897581111, 8897681111, 8897781111 या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बन्नी, ब्रम्हा यासाठी निश्चित केलेल्या मापदंडानुसार 8 हजार 110 रूपये, बन्नी, ब्रम्हा स्पेशलसाठी 8 हजार 60 रूपये, एच-4 साठी 8 हजार 10 रूपये आधारभूत किंमत जाहिर करण्यात आली आहे. हे किमान आधारभूत दर 8 टक्के आर्द्रता असलेल्या कापूसासाठी लागू आहेत. कापसाच्या विक्रीसाठी कपाशीची कमाल आर्द्रता केवळ 12 टक्के पर्यंतच स्वीकार्य आहे. जर कापसाची आर्द्रता 8 टक्क्यापेक्षा जास्त असेल, तर प्रत्येक 1 टक्के आर्द्रता वाढली तर किमान आधारभूत किंमत नियमानुसार 1 टक्क्यानी कमी केली जाणार आहे.

बन्नी ब्रह्मा आणि एच-4 या जातींसाठी, जर मायक्रोनेअर मूल्य मायक्रोनेअर मूल्य श्रेणीच्या बाहेर असल्यास त्यानंतर प्रत्येक 0.2 मायक्रोनेअर मूल्यासाठी, नियमानुसार किमान आधारभूत किंमतीतून अनुक्रमे 25 रूपये प्रति क्विंटलप्रमाणे कमी केले जाणार आहे. महामंडळ निकृष्ट दर्जाचा, विरंगित कापूस, पावसात, पाण्यात भिजलेला कापूस खरेदी करणार नाही. महामंडळ केवळ बाजार समित्यांद्वारे पडताळणी केलेल्या शेतकऱ्यांकडूनच कापूस खरेदी करणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी महामंडळाला कापूस विकण्यापूर्वी बाजार समित्यांच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची पडताळणी अवश्य करून घ्यावी, असे आवाहन भारतीय कापूस महामंडळाने केले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages