अमरावती, दि. 11 (ग्रामीण उदय प्रतिनिधी ) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागांतर्गत सोमठाणा खुर्द येथील वाढीव जमीन मोबदल्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.
सोमठाणा खुर्द येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या मूल्यांकनाच्या चार पट मोबदला लवकरच वितरित केला जाणार आहे. यासाठी 100 रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर अर्ज, बँक खाते पुस्तकाची छायाप्रत, शेतीचा सातबारा उतारा, लाभार्थी मयत असल्यास वारस प्रमाणपत्र आणि वारसाच्या बँक पासबुकची छायाप्रत ही कागदपत्रे तातडीने सादर करणे आवश्यक आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव संरक्षणासाठी सोमठाणा खुर्द गावातील 42 शेतमूल्यांकनधारक आणि 21 वनहक्कधारक यांच्या जमिनींचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यापूर्वी, त्यांना जमिनीच्या मूल्यांकनाच्या एक पट रक्कम आणि त्यावर 30 टक्के दिलासा रक्कम देण्यात आली होती. मात्र, 12 ऑक्टोबर 2015 रोजीच्या नवीन शासन निर्णयानुसार, भू-संपादन कायदा 2013 लागू झाला आहे. या कायद्यानुसार, जमिनीचा मोबदला पुनर्वसन पॅकेजव्यतिरिक्त दिला जातो आणि तो जमिनीच्या मूल्यांकनाच्या चार पट असणे अपेक्षित आहे. त्यामुळे, या लाभार्थ्यांना यापूर्वी मिळालेली रक्कम वगळून, उर्वरित मोबदला देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
यात अनेक लाभार्थ्यांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे सादर केली नसल्याने मोबदला मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांना हक्काचा मोबदला तातडीने मिळणार आहे. या गावातील पात्र लाभार्थ्यांची सविस्तर यादी mahaforest.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे उपवनसंरक्षक आर. एस. टोलिया यांनी यांनी कळविले आहे.
00000
Post a Comment
0 Comments