Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मध्यप्रदेशमधून बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई


अमरावती, १७(ग्रामीण उदय प्रतिनिधी) : अमरावतीतील रीच गार्डन हॉटेलमध्ये मध्यप्रदेश राज्यात विक्रीस असलेली परराज्यातील दारू बेकायदेशीरपणे विक्रीस ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करण्यात आली.

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या तपासणीत मध्यप्रदेशातील विविध ब्रँडची 292 बॉटल्स सापडल्या. यामध्ये 1 हजार मिली, 750 मिली, 375 मिली व 180 मिली क्षमतेच्या बॉटल्सचा समावेश आहे. सदर दारूची एकूण किंमत सुमारे 1 लाख 17 हजार इतकी आहे.

अनुज्ञप्तीधारक राज सुनील शाहू तसेच हॉटेलचे व्यवस्थापक निखिल अनिल शाहू  यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर हॉटेलमध्ये परराज्यातून आणलेली दारू बेकायदेशीररित्या विक्रीस ठेवण्यात आली होती. ही दारू ग्राहकांना विक्री करण्यासाठी सज्ज स्थितीत होती. यामुळे संबंधित अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात आली .

 

        तसेच अमरावती येथील हॉटेल आर. के. रेस्टॉरेंट अ‍ॅण्ड बार, बायपास बडनेरा रोड येथेही कारवाई करण्यात आली.  येथील मद्य भेसळयुक्त तसेच कमी तीव्रतेचे असल्याचे नमुन्याच्या तपासणीअंती आढळून आले. अनुज्ञप्तीधारक राजकुमार छतुमल रतणानी  यांची जिल्हाधिकारी यांच्या समक्ष सुनावणी घेण्यात आली.

 

जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले की, शासन महसुलाचे नुकसान होते तसेच जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे निरीक्षण नोंदवून सदर अनुज्ञप्ती एक महिन्यासाठी रद्द करण्यात आली. परराज्यातील दारूची विक्री राज्यात परवानगीशिवाय करणे गंभीर गुन्हा आहे. यापुढील काळातही अशा बेकायदेशीर कारवायांवर कठोर पावले उचलली जातील, असा इशाराही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावेळी दिला.


Tags

Post a Comment

0 Comments