Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

देशी दारूची एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री, सात दुकानांवर कारवाई


 

अमरावती, दि. 17 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): किरकोळ किंमतीपेक्षा जास्त दराने देशी दारूची विक्री करणाऱ्या सात दुकानांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. विभागाने बनावट ग्राहक पाठवून केलेल्या तपासणीत ही बाब निदर्शनास आली आहे.

 

या प्रकरणी, विजय बी. जयस्वाल (अनुज्ञप्ती क्र. 160, बडनेरा रोड), मे. एस. पी. लिकर्स (अनुज्ञप्ती क्र. 116, मालखेड रेल्वे), श्रीमती शोभा नरेश जयस्वाल (अनुज्ञप्ती क्र. 74, अचलपूर), श्रीमती सलीमाबी अब्दुल खलीद (अनुज्ञप्ती क्र. 56, अंजनगाव सुर्जी), श्रीवास्तव वाईन्स (अनुज्ञप्ती क्र. 71, अंजनगाव सुर्जी), श्री. व्ही. बी. भगत (अनुज्ञप्ती क्र. 78, नांदगावपेठ), आणि श्री महाराष्ट्र वाईन्स (परतवाडा) या अनुज्ञप्तीधारकांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

या दुकानांमध्ये कमाल किरकोळ किंमतीपेक्षा 10 रुपये जास्त दराने देशी दारू विकली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात, जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड भरण्याची प्रकरणे सादर करण्यात आली आहेत. तसेच, सातही अनुज्ञप्तीधारकांना एकूण तीन लाख पन्नास हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 

ही रक्कम 15 दिवसांत शासनाकडे जमा न केल्यास व्याजासह दंडाची रक्कम वसूल केली जाईल आणि अनुज्ञप्ती निलंबित केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. ग्राहकांना जास्त दराने देशी दारू विकली जात असल्यास त्यांनी टोल फ्री क्र. 18008333333 किंवा व्हॉटसॲप क्र. 8422001133 वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments