महिलांनी आरोग्य शिबीरातील सेवेचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी आशिष येरेकर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 23, 2025

महिलांनी आरोग्य शिबीरातील सेवेचा लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 






*'जागर महिला आरोग्याचा’चे उद्घाटन

अमरावती, दि. 24 (ग्रामीण उदय प्रतिनिधि): अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशेव्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशानातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन आणि तपासणी शिबीर घेण्यात येत आहे. या आरोग्य शिबीराचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

जिल्हा नियोजन सभागृहात आजपासून जागर महिला आरोग्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बयास, माविमचे डॉ. रंजन वानखेडे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चाफले, मार्गदर्शक डॉ. भावना सोनटक्के, डॉ. नेहा देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, जिल्ह्यातील मेळघाटात आजही बालके आणि महिलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. बालमृत्यूबाबत गेल्या कालावधीत चांगले कार्य झाल्याने यावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. मात्र मातामृत्यूबाबत अद्यापही काळजी घेणे आवश्यक आहे. मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी मेळघाट परिक्रमा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात तज्ज्ञ डॉक्टरांचे शिबीर आयोजित करण्यात येत आहे. यामुळे अतिजोखमीच्या माता आणि बालकांची माहिती होण्यास मदत मिळेल.

जिल्हा प्रशासनातर्फे वर्षभर उपक्रम राबविण्यात येणार आहे. यातील नवरात्रोत्सवात महिलांची आरोग्य तपासणी हा महत्वाचा उपक्रम आहे. तसेच याठिकाणी महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जीवनशैलीतील बदलामुळे शहरी आणि ग्रामीण भागात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. वेळीच निदान आणि उपचारामुळे हा आजार बरा होणे शक्य आहे. याठिकाणी घ्यावयाची काळजी याबाबतही मार्गर्शन होणार आहे. उत्तम वक्ते उपलब्ध होणार असल्याने महिलांनी शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून जागर महिला आरोग्याचा उपक्रम तयार आहे. यात महिलांची संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. तसेच महिलांच्या कर्करोगाबाबत तपासणी करण्यासाठी मेमोग्राफी वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. महिलांनी आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages