रेल्वे पुलाबाबत आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे निर्देश - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, September 24, 2025

रेल्वे पुलाबाबत आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे निर्देश



*संयुक्त पथकाचा पाहणी अहवाल गुरूवारपर्यंत मागविला

अमरावती, दि. 25 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : शहरातील राजकमल रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी असुरक्षित घोषित करण्यात आल्यानंतरही, त्याखालून रेल्वे वाहतूक सुरू असल्याने संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हादंडाधिकारी आणि जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आशिष येरेकर यांनी हे आदेश जारी केले आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशामध्ये रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्त पाहणी पथकाद्वारे पुलाची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यासाठी रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक संयुक्त पाहणी पथक तात्काळ स्थापन करावे. या पथकात पुलाला असुरक्षित घोषित करणाऱ्या स्ट्रक्चरल कन्सल्टंटचाही समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. हे पथक रेल्वे वाहतुकीला असलेल्या धोक्याचे मूल्यांकन करून पुलाच्या संरचनेची सद्यस्थिती तपासणार आहे. पुलावरून वाहतूक बंद असली तरी पुलाखालून रेल्वे वाहतूक सुरू असल्याने पुलाला सुरक्षित करेपर्यंत किंवा तो पाडण्यात येईपर्यंत रेल्वे वाहतूक थांबवणे, वळवणे किंवा नियंत्रित करण्याची तातडीची गरज असल्याबाबत पथकाने अहवाल देणे आवश्यक आहे. हा संयुक्त पाहणीचा अहवाल आणि शिफारशी दि. 25 सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.

सदर आदेशानुसार रेल्वेसाठी निर्देश देण्यात आले आहे. यात संयुक्त पाहणीमधील शिफारशीनुसार रेल्वे वाहतूक थांबवणे, वळवणे किंवा नियंत्रित करणे, पुलाचे गर्डर्स आणि सुपरस्ट्रक्चर नियंत्रित आणि सुरक्षित पद्धतीने पाडण्यासाठी कृती आराखडा तयार करून तो 25 सप्टेंबर 2025 पर्यंत सादर करणे, पुलाचे काम होईपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्व गाड्यांना वेगमर्यादा लागू करणे, संरचनेतील कोणत्याही बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी पूर्ण वेळ देखरेख कर्मचाऱ्याची नेमणूक करणे, वास्तविक-वेळ निरीक्षण प्रणालीमध्ये टिल्ट मीटर्स आणि क्रॅक प्रोपगेशन गेज स्थापित करणे, तसेच आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक उपकरणे आणि पथके तयार ठेवण्याचे निर्देश विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर आणि भुसावळ रेल्वे विभागाला देण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला रेल्वे रुळाखालील बेलपुराकडे जाणारा समांतर रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याबाबत खातरजमा करावी आणि त्याची तपासणी करून प्रमाणपत्र देणे, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सूचना फलक आणि इतर उपाययोजना करावी, तसेच आदेशाचे तात्काळ पालन झाले नसल्यास राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, 2005 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages