Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला दि. 15 सप्टेंबर पासून सुरुवात


*नागरिकांनी सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन

अमरावती, दि. 17 : स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला दि. 15 सप्टेंबर पासून सुरूवात करण्यात आली  आहे. या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.

या अभियानाचा कालावधी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर २०२५ असा 100 दिवसांचा राहणार आहे. अभियानात गावांमध्ये सुशासन प्रस्थापित करणे, आत्मनिर्भरता निर्माण करणे आणि विकासासाठी स्पर्धात्मक भावना वाढवणे यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात ग्रामस्थांचा प्रत्यक्ष सहभाग असणार आहे.

अभियानात सुशासनयुक्त पंचायतीत पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन, सक्षम पंचायतीत आर्थिक स्वावलंबन, सामाजिक उत्तरदायीत्व आणि लोकवर्गणी, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गावात पर्यावरण आणि पाणी व्यवस्थापन, योजनांचे अभिसरणात मनरेगा आणि इतर योजनांची अंमलबजावणी, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरणात शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे इत्यादी, उपजीविका विकास व सामाजिक न्यायमध्ये रोजगार निर्मिती आणि महिला सक्षमीकरण, लोकसहभाग व श्रमदानात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि लोकचळवळ, नाविन्यपूर्ण उपक्रमात ग्रामपंचायतींनी राबवलेले अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यात ग्रामपंचायत स्तरावरील पुरस्कारात राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, तर पंचायत समिती स्तरावरील पुरस्कारात राज्य आणि विभागस्तरीय पुरस्कार देण्यात येतील. जिल्हा परिषद पुरस्कारात राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतील.

अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा आयोजित केली जाईल. या सभेला शक्य असेल तिथे पालकमंत्री, खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. या विशेष ग्रामसभेला ग्रामस्थांना उपस्थित राहून अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments