Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जिल्ह्यात सेवा पंधरवडा प्रभावीपणे राबविणार -जिल्हाधिकारी आशिष येरेकर






 

अमरावती, दि. 17 : राज्य शासनाच्या निर्देशानुसार 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात तीन टप्प्यात हा उपक्रम राबविण्यात येणार असून यात हाती घेण्यात आलेले उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, सेवा पंधरवडा मोहिमेमध्ये पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत. यात नागरिकांना प्रशासकीय सेवा या जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी आलेल्या काही महत्त्वाच्या सूचनाही या अभियानात समाविष्ट करण्यात येणार आहे.

 

      शासनाच्या निर्देशानुसार या पंधरवड्यामध्ये पहिल्या टप्प्यात दि. 17 ते 22 सप्टेंबर दरम्यान पाणंद रस्ते आणि शेतीला जोडणारे मार्ग, तसेच पाणंद, शिवरस्त्यांना क्रमांक देण्याच्या महसूल विभागाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करून ते गाव नकाशावर चिन्हांकित केले जातील. निस्तार पत्रकामध्ये नोंद नसलेल्या पाणंद रस्त्यांची नोंद घेण्याची कार्यवाही केली जाईल. शेतकऱ्यांसाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र घेतले जातील. रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जातील. शिवार फेरी घेऊन शेतरस्त्यांची मोजणी आणि सीमांकन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात राबविण्यात आलेला पाणंद रस्त्याचा पॅटर्न राज्य शासनाने स्वीकारला आहे. रस्ते मोकळे करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहे. तसेच हे रस्ते वहिवाटीसाठी मोकळे करून देण्यात येणार आहे.

 

      दुसऱ्या टप्प्यात दि. 23 ते 27 सप्टेंबरमध्ये 'सर्वांसाठी घरे' योजनेची अंमलबजावणी केली जाईल. यात घरे बांधण्यासाठी शासकीय जमिनी कब्जे हक्काने दिल्या जातील. शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुसार नियमित केली जातील. पात्र लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे वाटप केले जातील. यामध्ये शासकीय जमिनी वाटप केलेल्या, अतिक्रमण नियमित केलेल्या तसेच २०११ पूर्वीच्या गावठाणातील अतिक्रमणे नियमित केलेल्या लाभार्थ्यांचा समावेश असेल. महापालिका, नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीमध्ये सुमारे दिड हजारावर पट्टेवाटप करण्यात येतील. जिल्ह्यातील 96 मंडळात महाराजस्व शिबिर घेण्यात येईल. यात एकाच ठिकाणी दाखले देण्याची सुविधा असेल. तसेच जिल्ह्यात एक वैशिष्ट्य उपक्रम म्हणून 300 गावात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात दि. 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात जनसंवाद,155 अंतर्गत आदेशांची तपासणी, जिवंत सातबारा मोहीम आणि 'गाव तिथे स्मशानभूमी' या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल. जिवंत सातबारा मोहिमेत आतापर्यंत सात हजार नोंदणी नव्याने घेण्यात आल्या आहे. तसेच शहरी बेघरांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

        या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती, उपअधीक्षक भूमी अभिलेख आणि विविध विभाग सहभागी  असणार आहेत. नागरिकांनी या 'सेवा पंधरवडा' मध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि विविध उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.


Post a Comment

0 Comments