अमरावती दि.५ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) – बीइंग आर्टिस्ट अकॅडेमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्ट्स, अमरावती येथे साहित्य सम्राट, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले असून अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी साहित्याचा आणि त्यांच्या जीवनकार्यावर सखोल आढावा घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या लिखाणातील निवडक कथा आणि शाहिरी सादरीकरणाद्वारे त्यांच्या विचारांची उजळणी करण्यात आली. या प्रसंगी बीइंग आर्टिस्ट अकॅडेमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस् चे संस्थापक अध्यक्ष, फिल्ममेकर पंकज धंदर यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आणि कलाकारांनी विविध साहित्यकृती सादर केल्या.
छक्कड - माझी मैना गावावर राहिली संदेश बायस्कर, तर सामाजिक वास्तव अधोरेखित करणाऱ्या कथा उपकाराची फेड, मरीआईचा गाडा, यश कावरे आणि पुष्कर देशमुख, यांनी अभिवाचन करून अण्णाभाऊंचा लढाऊ विचार पुढे आणला. कथा अभिवाचनासोबतच शाहिरी, पोवाडा गायन आणि गीतांच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील संघर्ष, समाजावरील प्रेम आणि परिवर्तनवादी विचार उलगडून त्यांच्या साहित्याचा सामाजिक संदर्भ, त्यांच्या रचनांमधील क्रांतिकारी विचार आणि समाजातील वंचित घटकांसाठी दिलेल्या योगदानावर चर्चात्मक सत्रात साक्षी जिभकाटे, प्रतिका तेलगोटे, प्रवीण वानखडे, श्रुतीका दंदे, योगेश लोंदे, अक्षय बकसरे यांनी उत्साहात भाग घेतला.
शेवटी, संस्थेचे अध्यक्ष पंकज धंदर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर आधारित "जग बदल घालुनी घाव" हे स्फूर्तीगीत सादर करून उपस्थितांमध्ये नवा जोश निर्माण केला तसेच अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखन, शाहिरी आणि विचारांद्वारे समाजातील वंचित घटकांना आवाज दिला. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत समाज परिवर्तनासाठी कार्यरत राहणे आवश्यक असल्याचे संस्थापक अध्यक्ष पंकज धंदर यांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments