Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

जिल्ह्यात महसुली तंटामुक्तीसाठी अभियान राबविणार

*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अभियानात गावांना पुरस्कार

 

अमरावती, दि. ६  : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून सुप्रशासन राबविण्यासाठी गावस्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महसुली तंटामुक्त गाव अभियान जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार आहे. यात तालुकानिहाय प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायती आणि जिल्हास्तरावर गुणानुक्रमे पहिल्या तीन ग्रामपंचायतींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

न्यायालयात दाखल होणाऱ्या दाव्यांमुळे विलंबाने निर्णय होत आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता विचारात घेऊन महसुली तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात अधिकार अभिलेखात पुरूषांसोबत त्याच्या पत्नीचे नाव दाखल करणे, अधिकार अभिलेखाच्या अनुषंगाने प्रलंबित नोंदीचा निपटारा करणे, जिल्ह्यातील सर्व स्तरावरील महसूल विषयक तंटे सामंजस्याने सोडविणे, पाणंद, शेतरस्त्याचे तंटे ग्रामस्तरावर सोडविणे, हद्दीवरून वहिवाटीचे असणारे वाद सोडविण या पाच प्रमुख मुद्यांवर भर दिला जाणार आहे. सदरचे अभियान १ ऑक्टोबर ते ३१  मार्च या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

सदरचे अभियान हे ग्रामपंचायतस्तरावर राबविण्यात येणार आहे. यासाठी ग्रामस्तरीय समिती असणार आहे. या समितीत ग्रामसभेने निवडलेला व्यक्ती अध्यक्ष, तर सरपंच, उपसरपंच, विविध समित्यांचे प्रतिनिधी, व्यापारी, पोलिस, माजी सैनिक, निवृत्त न्यायाधीश, निवृत्त पोलिस अधिकारी, महिला बचत गट आदींचे प्रतिनिधी सदस्य म्हणून राहणार आहे. ग्राम महसूल अधिकारी सदस्य सचिव राहणार आहे. ग्रामस्तरीय समितीकडून आलेले प्रस्ताव तालुकास्तरीय समिती मुल्यमापन करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठविणार आहे. तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती असणार आहे. तसेच तालुकास्तरीय समितीकडून आलेले प्रस्ताव तपासणी करणे आणि अंतिम गुणांकन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.

गावपातळीवर सर्वसाधारणपणे क्षुल्लक कारणामुळे महसुली तंटे सुरू होतात. क्षुल्लक तंट्याचे निराकरण पूर्वीप्रमाणे गावपातळीवर शक्य नसल्याने पर्यायाने न्यायालयीन कामाचा ताण वाढतो आहे. तसेच राज्यात साक्षरता अधिक असताना नागरिकांमध्ये कायदेविषयक साक्षरता अपेक्षित पातळीपर्यंत पोहोचली नसल्याने महसुली तंट्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यापर्यंत महसुली तंटामुक्तीसाठी गावागावात पुढाकार या अभियानातून घेण्यात येणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महसुली तंटामुक्त गाव अभियान प्रभावीपणे राबविल्यास सहा महिन्यात आपसी वाद मिटण्यास मदत होणार आहे. तसेच येत्या दोन वर्षात गावात महसुली तंटे होणार नाही. त्यामुळे गावागावात शांततेचे वातावरण निर्माण होऊन विधायक कार्य घडण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गावाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments