शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वर्षभर मोहीम; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 10, 2025

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वर्षभर मोहीम;


जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

अमरावती, दि. ११  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): जिल्ह्यात एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आता वर्षभर विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या संदर्भात, शाळाबाह्य विद्यार्थी जिल्हा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच पार पडली.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, महिला व बालविकास अधिकारी, समाज कल्याण अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, समग्र शिक्षाचे जिल्हा समन्वयक, तसेच माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यावेळी  उपस्थित होते.

प्रत्येक घरोघरी, बस स्थानके, रेल्वे स्थानके, हॉटेल्स, खानावळी, सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा, वीटभट्ट्या आणि शेतशिवारात जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा. स्थलांतरित होणाऱ्या प्रत्येक मुलाला शाळेने शिक्षण हमी कार्ड द्यावे आणि ते मूल जिथे स्थलांतरित होईल, तेथील जवळच्या शाळेत त्याला प्रवेश द्यावा. मुख्याध्यापकांनी स्थलांतराची संभाव्य जागा आणि प्रवेशाची माहिती दप्तरी नोंदवून ठेवावी. या सर्वेक्षणात स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी, तसेच माध्यमिक विभागाने १८ वर्षांपर्यंतच्या मुलींना शिक्षण प्रवाहात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. सर्वेक्षण केवळ ठराविक कालावधीत न करता, वर्षभर ही प्रक्रिया चालू ठेवावी, जेणेकरून एकही मूल शिक्षणाविना राहणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages