खरीप हंगामासाठी राज्यस्तरीय पीकस्पर्धा जाहीर: शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, July 10, 2025

खरीप हंगामासाठी राज्यस्तरीय पीकस्पर्धा जाहीर: शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन


अमरावती,दि.११ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने खरीप हंगाम २०२५  साठी राज्यस्तरीय पीकस्पर्धेचे आयोजन केले असून, या माध्यमातून प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन राज्याच्या कृषी उत्पादकतेत वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या ११  प्रमुख पिकांचा समावेश आहे. मूग आणि उडीदसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१  जुलै २०२५  असून, इतर पिकांसाठी ३१  ऑगस्ट २०२५  पर्यंत मुदत आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, राहुल सातपुते यांनी केले आहे.

स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटाला प्रति पीक  ३०० रुपये तर आदिवासी गटाला १५०  रुपये प्रवेश शुल्क आकारले जाईल. शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आणि ती तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. भात पिकासाठी किमान २०  आर आणि इतर पिकांसाठी ४०  आर (१  एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे बंधनकारक आहे.

ही स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित केली जाईल आणि विजेत्यांना राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर आकर्षक रोख बक्षिसे दिली जातील. तालुका पातळीवर ५,००० रुपये, जिल्हा पातळीवर १०,०००  रुपये, तर राज्य पातळीवर ५०,०००  रुपयांपर्यंतचे पहिले बक्षीस मिळेल.

इच्छुक शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज, शुल्क भरल्याचे चलन, ७/१२  उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पिकाच्या क्षेत्राचा नकाशा आणि बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत या कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी, कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा स्थानिक कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages