अमरावती, दि.2 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये ५ टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने खेळाडूंसाठी ‘क्रीडा ई-प्रमाण’ ही ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे खेळाडूंना घरी बसून अत्यंत सोप्या पद्धतीने आपले क्रीडा ई-प्रमाणपत्र मिळवता येणार आहे.
ही नवीन प्रणाली ब्लॉकचेन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहे, ज्यामुळे बोगस प्रमाणपत्रांच्या गैरप्रकारांना पूर्णपणे आळा बसेल. खेळाडूने पोर्टलवर माहिती भरल्यानंतर, ती मूळ डेटाशी जुळल्यास अवघ्या २४ तासांच्या आत डिजिटल पडताळणी अहवाल उपलब्ध होणार आहे. तसेच, प्रत्येक प्रमाणपत्रावर एक क्युआर कोड सुरक्षा असेल. नियुक्ती प्राधिकारी हा क्युआर कोड स्कॅन करून प्रमाणपत्राची सत्यता त्वरित पडताळू शकतील.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर सर्व शासकीय पदभरतीसाठी अर्ज करताना खेळाडूंना आता हे ‘क्रीडा ई-प्रमाणपत्र’ जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू संवर्गातून अर्जाचा विचार केला जाणार नाही. ज्या खेळाडूंनी यापूर्वी विभागीय उपसंचालकांकडून प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेतली आहे, त्यांनाही आगामी भरती प्रक्रियेसाठी या नवीन प्रणालीद्वारे प्रमाणपत्र तयार करून घेणे बंधनकारक आहे.
या प्रणाली अंतर्गत ५ टक्के खेळाडू आरक्षणाचे क्रीडा संघटनेमार्फत प्राप्त अभिलेख (रेकॉर्ड्स) 'क्रीडा ई-प्रमाण' पोर्टलवर अपलोड केले जात आहेत. अधिकृत स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंनी प्रमाणपत्र मिळविण्याकरिता क्रीडा विभागाच्या sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर आपली नोंदणी पूर्ण करावी आणि प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन क्रीडा विभागाकडून करण्यात आले आहे.
कबड्डी,फेन्सिंग,ट्रायथलॉन (२०२५ ची स्पर्धा),ज्युडो (२०२४ ची स्पर्धा),कुराश (२०२४-२५ व २०१७-१८) या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध आहेत, त्याच खेळाडूंनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत. इतर पात्र खेळांच्या खेळाडूंनी नोंदणी करावी,इतर अभिलेख देखील अपलोड करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कळविले आहे.