‘अव्वल पक्ष, दुय्यम महिला!’ या मध्यवर्ती विषयातून महिलांच्या राजकीय नेतृत्वाचा आणि संघर्षाचा वेध
अमरावती : महिला राजसत्ता आंदोलनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘राजसत्तेतल्या कारभारणी २०२६’ या विशेषांकाचे प्रकाशन सोमवार, दि. २३ नोव्हेंबर २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालय, पुसदा, ता. जि. अमरावती येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. महिला राजसत्ता आंदोलनाच्या पुसदा गावशाखेच्या अध्यक्ष अनुराधा गोफने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात डॉ. प्रतिभा भोरजार यांच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
रिसोर्स सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट (RSCD), मुंबई यांच्या अंतर्गत कार्यरत महिला राजसत्ता आंदोलन हे पंचायत राज संस्थांमधील महिला सदस्य, सरपंच, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या तसेच भावी नेतृत्वशील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी संघटन, प्रशिक्षण, समर्थन व संरक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात काम करीत आहे. महिलांची नेतृत्वक्षमता विकसित करणे, परस्पर सहकार्याचे भक्कम जाळे उभे करणे, शेतजमीन व घरावर स्त्री-पुरुषांची संयुक्त मालकी, महिला धोरणाची गाव-पाड्यांपर्यंत अंमलबजावणी, ग्रामसभेला निर्णयाचे अधिकार आणि महिला ग्रामसभेची निर्णायक भूमिका निर्माण करणे, तसेच नैसर्गिक संसाधनांच्या मालकी व निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविणे ही या आंदोलनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
यावर्षीच्या ‘राजसत्तेतल्या कारभारणी’ या विशेषांकासाठी ‘अव्वल पक्ष, दुय्यम महिला!’ ही मध्यवर्ती संकल्पना घेण्यात आली आहे. राजकीय पक्षांमधील महिला कार्यकर्त्यांचे नेतृत्व, पंचायत राज व्यवस्थेतील महिला पंच व सरपंच, आंदोलनातील कार्यकर्त्या, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्या लेखनातून व मुलाखतींतून महिलांच्या राजकीय सहभागाचे वास्तव, त्यांचे नेतृत्व, संघर्ष आणि निर्णयप्रक्रियेतील स्थान यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळाले असले तरी प्रत्यक्ष सत्तेच्या निर्णयप्रक्रियेत त्यांना किती स्थान मिळते, हा महत्त्वाचा प्रश्न या अंकातून उपस्थित करण्यात आला आहे.
या अंकाच्या अतिथी संपादक म्हणून निर्मला सामंत-प्रभावळकर, संपादक म्हणून शालू तिरपूडे, तर कार्यकारी संपादक म्हणून आदिती कुरघोडे यांनी जबाबदारी सांभाळली आहे. सल्लागार संपादक मंडळात मालतीताई सगणे (अध्यक्ष, महिला राजसत्ता आंदोलन), रत्नमालाताई वैद्य (राज्य समन्वयक), राजश्री हिरा मधुकर (राज्य कार्यक्रम समन्वयक), शरद रमेश (माध्यम समन्वयक) आणि नयनी पालकर (कार्यक्रम सहयोगी) यांचा समावेश आहे. अंकाची संकल्पना महिला राजसत्ता आंदोलनाचे संस्थापक सदस्य भीम रासकर यांची आहे.
या अंकासाठी मुलाखती घेण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी डॉ. प्रतिभा भोरजार, प्रफुल्ल मंदा श्रीधर कुकडे, निकिता पाटील, सूर्यकांत कांबळे, प्रतिभा खापरे, भारती टकले, मयुरी लाड तसेच स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी पार पाडली.
प्रकाशन सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. प्रतिभा भोरजार (संचालक, आय.ए.एस. पूर्वतयारी प्रशिक्षण केंद्र तथा राज्यशास्त्र विभाग प्रमुख, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती), विजय डवरे (जिल्हा प्रधान सचिव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती), प्रतिभा खापरे (जिल्हा समन्वयक, महिला राजसत्ता आंदोलन, अमरावती) आणि राहुल वाघमारे (शाखा कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुसदा) उपस्थित होते.
यावेळी अश्विनी वानखडे, प्रियंका विधळे, सुनीता बोकडे, संगीता मानकर, गीता पाथरे, वनिता भोंडे यांच्यासह महिला राजसत्ता आंदोलनाच्या गावशाखेतील महिला सदस्य तसेच गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन महिला राजसत्ता आंदोलनाचे प्रशिक्षक तथा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर कुकडे यांनी केले.
महिलांना केवळ राजकीय आरक्षणापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष निर्णयप्रक्रियेतील समान अधिकार आणि नेतृत्वाची संधी मिळाली पाहिजे, हा विचार ‘राजसत्तेतल्या कारभारणी २०२६’ या अंकातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.
