पांदन रस्त्याच्या कामात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप
शिरजगाव कसबा
ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क दिनांक ५
(ओमप्रकाश कुऱ्हाडे)
चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे ग्रामीणांनी स्वतःच्या खर्चातून व श्रमदानातून तयार केलेल्या पांधन रस्त्याच्या कामासाठी शासकीय निधी काढल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संबंधित ठेकेदार, रोजगार सेवक व अधिकाऱ्यांच्या संगनमताने काम न करताच मस्टर व बिलांच्या माध्यमातून निधी काढण्यात आल्याचा आरोप ग्रामीणांनी केला असून, या प्रकरणात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद पेठे ते दीपक दाभाडे पांदन रस्ता या मार्गाच्या कामासाठी अलीकडेच निधी काढण्यात आला मात्र, संबंधित रस्त्यावर कोणतेही प्रत्यक्ष काम झाले नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. उलट, या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी दोन महिन्यांपूर्वी स्वतः पैसे जमा करून आणि श्रमदानातून मुरूम टाकल्याचे सांगितले आहे
याच पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष काम न करता शासकीय निधी काढण्यात आल्यास संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी तक्रारदार ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषद मुख्य पालन कार्यकारी अधिकारी, चांदूरबाजार तहसीलदार व अचलपूर आमदार प्रवीण तायडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
मातोश्री पांदन रस्ता योजनेतील कामांवरही प्रश्नचिन्ह
मातोश्री पांदन रस्ता योजनेअंतर्गत परिसरात सुरू असलेल्या विविध कामांमध्ये अनियमितता होत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. प्रत्यक्ष बांधकाम न करता किंवा अपूर्ण काम पूर्ण झाल्याचे दाखवून बिलांची उचल केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यापूर्वीही एसटी स्टँड, सोमवारखेडा ते पानझरी तलाव पांदन रस्ता या कामाबाबत काम न करता मस्टर काढल्याची तक्रार शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली होती. मात्र, तक्रारीनंतरही संबंधित यंत्रणेकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून प्रत्यक्ष कामाची पाहणी करावी, शासकीय निधीचा गैरवापर झाला आहे का याची तपासणी करावी आणि दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याकडून करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया-
(१) “या रस्त्यावर दोन महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांनी पैसे जमा करून स्वतःच्या खर्चातून मुरूम टाकला आहे. मात्र, अलीकडेच या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून निधी काढण्यात आल्याचे समजले. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रार केली आहे.”
– अमित लेवटे,
तक्रारदार नागरिक
शिरजगाव कसबा
(२) संबंधित पांदण रस्ता तक्रार तहसील कार्यालयाला प्राप्त झाली असून त्यासंबंधी सार्वजनिक बांधकाम उपविभाग चांदूरबाजार कार्यालय यांना पत्र देऊन संबंधित तक्रारी संदर्भात खुलासा मागितला आहे.
उमेश तागडे
सहाय्यक प्रकल्प अधिकारी