पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी ‘इको-फ्रेंडली गणेश मूर्ती रंगरंगोटी महोत्सवा’तून पर्यावरण संवर्धनाचा जागर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 11, 2026

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी ‘इको-फ्रेंडली गणेश मूर्ती रंगरंगोटी महोत्सवा’तून पर्यावरण संवर्धनाचा जागर


 

·         सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन


·         मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री नितेश राणे यांच्यासह मान्यवरांचा सहभाग


 

            मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि उद्योग विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘निसर्गमित्र गणेशोत्सव व हातकागद कला संवर्धन’ उपक्रमांतर्गत ‘इको-फ्रेंडली गणेश मूर्ती रंगरंगोटी महोत्सव-2026’ चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विविध मान्यवरांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीं रंगरंगोटी करून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश दिला.     

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित या उपक्रमाचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात आले. सांस्कृतिक र्का मंत्री शेलार यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीवर रंगकाम करून उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी खादी वस्त्रांचे तसेच ‘मधुबन’ मध विक्री प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील,

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्यासह मान्यवरांचा सहभाग

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनीही उपक्रमाला भेट देत पर्यावरणपूरक गणेशमूर्तीवर रंगकाम केले आणि उपक्रमाची पाहणी केली.

या उपक्रमात मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सचिव दत्तात्रय नवले, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, सह मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, अर्थसल्लागार व मुख्य लेखाधिकारी सुनील मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाच्या सहसचिव विद्युत वरखेडकर, अवर सचिव मनीष मिलके, सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव जयंत उमराणीकर, गृह विभागाचे उपसचिव संजय डगले, उद्योग विभागाचे उपसचिव अजित सासुलकर तसेच नियोजन विभागाच्या सहसचिव गीतांजली बाविस्कर यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सहभागी होवून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीवर रंगकाम केले.


हातकागदापासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व आकाशकंदील

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या नियंत्रणाखाली पुणे येथे हातकागद संस्था कार्यरत आहे. या संस्थेत विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक हातकागदाची निर्मिती केली जाते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या चिंध्यांपासून तयार केलेल्या हातकागदाच्या लगद्याचा वापर करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तसेच आकाशकंदील तयार करण्यात येतात.

पर्यावरणपूरक उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि हातकागद कलेचे संवर्धन करणे, या उद्देशाने मंडळामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या वापराला प्रोत्साहन देऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करण्यासाठी नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत यांनी केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages