अमरावती, दि.९(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. जिल्ह्यातील युवकांना टुरीझम हॉस्पीटॅलीटी आणि होम केअरटेकर यासारख्या क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी निर्माण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात काल कौशल्य विकास विभागाची बैठक घेण्यात आली. यावेळी सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर उपस्थित होत्या. बैठकीत जिल्ह्यात येत्या वर्षात राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण वर्गाबाबत माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्यात लवादा येथे बांबूचे प्रशिक्षण देण्याची चांगली व्यवस्था होऊ शकते. यादृष्टीनेही विचार करण्यात यावा, अशी सूचना केली. तसेच इतर राज्यातून प्रामुखने हॉटेल क्षेत्रात युवक पुढे येत आहे. एका राज्यातून प्रशिक्षण घेऊन हे युवक इतर राज्यात रोजगार करीत आहे. यासारखा प्रयोग जिल्ह्यातही व्हावा. राज्यातील मोठ्या शहरात ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणाऱ्या मनुष्यबळाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर या प्रशिक्षणाची बॅच सुरू करावी.
संत गाडगेबाबत अमरावती विद्यापीठ ईव्ही वाहनांच्या क्षेत्रात कार्य करीत आहे. याठिकाणी ईव्हीचे प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात यावी. युवकांना कौशल्य प्रशिक्षण आवश्यक आहे, तसेच प्रशिक्षणानंतर रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात यावे. येत्या 29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात 15 ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ आयोजित करण्यात येणार आहे. यात अनुभव असलेल्या युवकांना सामावून घ्यावे. तसेच खासगी कंपन्यांकडून रोजगार देताना अनुभव असलेल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.
यावेळी किमान कौशल्य योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आदींचा आढावा घेण्यात आला.