दिनांक:४ सप्टेंबर २०२६
शिफारसप्राप्त २९६ उमेदवारांचीकागदपत्र पडताळणी ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान
अमरावती, दि. ४ : अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक संवर्गातील ४६८ रिक्त पदांची पदभरती पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहे. सदर पदभरतीच्या मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेमध्ये २९६ शिफारसप्राप्त उमेदवारांची गुणवत्ता यादी २७ ऑगस्ट २०२६ रोजी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिफारसप्राप्त उमेदवारांच्या मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रांची पडताळणी ३ ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती उप आयुक्त श्रीकांत धोटे आदिवासी विकास, अमरावती यांनी दिली.
पदनिहाय व माध्यमनिहाय शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीचे सविस्तर वेळापत्रक विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचून त्यानुसार कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहावे. सर्व शिफारसप्राप्त उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदविलेल्या माहितीनुसार आवश्यक स्व-प्रमाणपत्र, शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची मूळ प्रमाणपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भातील लागू प्रमाणपत्रे, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास), टीईटी/सीटीईटी प्रमाणपत्र, दिव्यांगत्व प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती व एक स्वयंसाक्षांकित छायांकित प्रत सोबत आणावी. उमेदवारांनी आपल्या पदासाठी निश्चित करण्यात आलेल्या दिनांक व वेळेनुसार कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहावे, असे आवाहन अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या कार्यालयाने केले आहे.