सेमाडोह येथे १३ नालसा योजनांची प्रभावी अंमलबजावणी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 4, 2026

सेमाडोह येथे १३ नालसा योजनांची प्रभावी अंमलबजावणी


 


अमरावती, दि. ५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (नालसा) मेगा ड्राईव्ह अंतर्गत चिखलदरा तालुक्याच्या सेमाडोह गावातील नागरिकांच्या दारापर्यंत विधी सेवा, कायदेविषयक मार्गदर्शन व विविध शासकीय योजना अशा एकूण १३ नालसा योजनांचा लाभ पोहचविण्यात येत आहे. ग्रामस्थांमध्ये या उपक्रमाबाबत उत्साह असून, त्यांच्या दारापर्यंत विधी सेवा आणि शासनाच्या योजनांची माहिती व लाभ पोहोचत असल्याने ग्रामस्थ समाधान व्यक्त करीत आहेत.

नालसाच्या निर्देशानुसार देशभरातील नागरिकांना त्यांच्या दारापर्यंत विधी सेवा, कायदेविषयक मार्गदर्शन तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी  महाराष्ट्रासह १८ राज्यांमध्ये नालसा मेगा ड्राईव्ह-१ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाद्वारे  या उपक्रमासाठी अमरावती जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दुर्गम व सामाजिक-आर्थिकदृष्ट्या गरजू भागाचा विचार करून चिखलदरा तालुक्यातील सेमाडोह गावाची निवड करण्यात आली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष  उज्वला नंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  प्राधिकरणाचे  सचिव   संजय  सहारे यांच्या समन्वयातून २५ ऑगस्ट २०२६ पासून मेगा ड्राईव्हची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. हा मेगा ड्राईव्ह  २३ ऑक्टोबर २०२६ पर्यंत चालणार आहे.

सेमाडोह येथे नालसा मेगा ड्राईव्ह टप्पा १ अंतर्गत १३ नालसा योजनांची तळागाळात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावतीचे सचिव, कार्यालयीन कर्मचारी तसेच पॅरा-लीगल स्वयंसेवक सेमाडोह गावास वारंवार भेटी देऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत आहेत. घरभेटी, सर्वेक्षण, कायदेविषयक जनजागृती, पात्र लाभार्थ्यांची ओळख वप्रकरणांची नोंद तसेच आवश्यकतेनुसार संबंधित शासकीय विभागांशी समन्वय साधण्याचे काम सुरू आहे. गावातील नागरिकांची माहिती संकलित करून पात्र लाभार्थ्यांची ओळख करण्यात येत आहे.

नागरिकांना त्यांच्या हक्कांची, विधी सेवांची तसेच विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती देऊन आवश्यकतेनुसार विधी सहाय्य व संबंधित विभागांशी समन्वय साधून योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विशेष उपक्रमास ग्रामस्थ, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि चिखलदरा तालुका प्रशासनाचे सहकार्य प्राप्त होत आहे.

   


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages