महा. अंनिसची अमरावती जिल्हा बैठक संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, September 28, 2026

महा. अंनिसची अमरावती जिल्हा बैठक संपन्न


चमत्कार प्रशिक्षणावर भर; चिखलदरा-धारणी येथे शाखा बांधणी दौरा

अमरावती, दि. २८ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा. अंनिस) अमरावती जिल्हा शाखेची जिल्हा बैठक गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, राधानगर येथे उत्साहपूर्ण व विचारमंथनात्मक वातावरणात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोळमकर होते. मार्गदर्शक म्हणून नरेंद्र धर्माळे व लक्ष्मण तडस उपस्थित होते.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य अधिक प्रभावीपणे गावागावात पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना चमत्कार प्रशिक्षण देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तथाकथित चमत्कारांमागील वैज्ञानिक कारणे, हातचलाखीचे प्रकार आणि फसवणुकीच्या पद्धती समजून घेऊन ते सर्वसामान्य नागरिकांसमोर वैज्ञानिक पद्धतीने मांडण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

अमरावती जिल्ह्यात संघटना बांधणीला अधिक गती देण्याबाबतही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. विशेषतः चिखलदरा व धारणी येथे लवकरच शाखा बांधणी दौरा आयोजित करून मेळघाट परिसरात अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांचा प्रसार वाढविण्याचे निश्चित करण्यात आले.

बैठकीत नुकत्याच अंबाजोगाई येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीचा अहवाल मांडण्यात आला. जिल्हा तसेच विविध शाखांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा प्रधान सचिव विजय डवरे यांनी जिल्हा अहवाल सादर केला.

प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी अंनिसच्या अंकाचे वर्गणीदार वाढविणे, अंकाचा व्यापक प्रसार आणि संघटना बांधणी याबाबत मार्गदर्शन केले. वैज्ञानिक व विवेकवादी विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अंनिसच्या अंकाचे नियमित वर्गणीदार वाढविण्याचे आवाहन करण्यात आले.

बडनेरा शाखेचा अहवाल बबिता वानखडे, दर्यापूरचा नरेंद्र धर्माळे, चांदूर रेल्वेचा पल्लवी ढोले, अमरावती शहर शाखेचा सचिन खोब्रागडे, चांदूर बाजार शाखेचा राहुल खंडारे, तर पुजदा शाखेचा अहवाल प्रतिभा खापरे यांनी सादर केला.

आगामी काळात बुवाबाजीविरोधी संघर्ष परिषद, चमत्कार प्रशिक्षण, लेखन-वाचन कार्यशाळा, विवेकवादी जनजागृती अभियान तसेच विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. ग्रामीण व शहरी भागात कार्यकर्त्यांचे जाळे अधिक मजबूत करून अंधश्रद्धेविरोधातील प्रबोधनात्मक कार्याला व्यापक स्वरूप देण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन अमरावती शहर शाखा प्रधान सचिव मंजू वासनिक यांनी केले. आभार संदीप हिवराळे यांनी मानले, तर समन्वय आशिष देशमुख यांनी साधला.

यावेळी विजय डवरे, सचिन खोब्रागडे,सचिन वासनिक,पल्लवी ढोले, बबिता वानखडे, नरेंद्र धर्माळे, प्रतिभा खापरे, राहुल खंडारे, संजय खापरे, संदीप हिवराळे, लक्ष्मण तडस, मंजू वासनिक यांच्यासह जिल्हा, शहर व ग्रामीण शाखांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढील जिल्हा बैठक व चमत्कार प्रशिक्षण रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. “अंधश्रद्धा हटवा – विवेक वाढवा” या भूमिकेसह वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांचा प्रसार अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करून बैठकीचा समारोप करण्यात आला.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages