दि. ७ शिरजगाव कसबा :-
शिरजगाव कसबा पांदण रस्ता कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार
चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा येथे गावकऱ्यांनी स्वतःच्या पैशातून आणि श्रमदानातून तयार केलेल्या पांदण रस्त्यावर चक्क सरकारी निधी काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पांदण रस्त्याच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचा थेट आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
शिरजगाव कसबा येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन, दोन महिन्यांपूर्वी स्वतः पैसे जमा केले आणि स्वखर्चातून व श्रमदानातून एका पांदण रस्त्यावर मुरुम टाकला होता. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे सोपे होईल. मात्र, संबंधित ठेकेदार, रोजगार सेवक आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने या रस्त्यावर कोणतेही प्रत्यक्ष काम न करता, बनावट मस्टर व बिलांच्या माध्यमातून शासकीय निधी लाटल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
"दोन महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांनी पैसे जमा करून स्वखर्चातून या रस्त्यावर मुरुम टाकला. अलीकडेच या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून निधी काढण्यात आल्याचे समजले. हा प्रकार अतिशय गंभीर असून, आम्ही वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रार केली आहे."
प्रत्यक्ष काम न करता निधी हडप करणाऱ्या संबंधित दोषींवर चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी. यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), चांदूर बाजारचे तहसीलदार आणि आमदार प्रवीण तायडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
(उमेश तागडे, सहायक मूल्य अधिकारी)
या प्रकरणावर प्रशासकीय बाजू मांडताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, संबंधित पांदण रस्ता तक्रार तहसील कार्यालयाला प्राप्त झाली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभाग चांदूर बाजार कार्यालय यांना पत्र देऊन संबंधित तक्रारीसंदर्भात लेखी खुलासा मागवण्यात आला आहे.
'मातोश्री पांदण रस्ता' योजनेतील कामांवर प्रश्नचिन्ह
या भागात 'मातोश्री पांदण रस्ता योजने' अंतर्गत सुरू असलेल्या इतर विविध कामांमध्येही मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
प्रत्यक्ष बांधकाम किंवा काम पूर्ण न करताच बिले उचलली जात असल्याचा दावा केला जात आहे.
यापूर्वीही एसटी स्टँड, सोमवारखेडा ते पानझरी तलाव पांदण रस्ता या कामांबाबत काम न करता मास्टर काढल्याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली होती. मात्र, तक्रारीनंतरही यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे.