अक्षय ऊर्जा संदेशासाठी विविध स्पर्धा, जनजागृती रॅली व ऊर्जा संवर्धनाची शपथ
अमरावती, दि. ३१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : विद्यार्थ्यांमध्ये अक्षय ऊर्जेचे महत्त्व, ऊर्जा संवर्धन, पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत, स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत विकासाबाबत जागृती निर्माणकरण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (इएसए) आणि विद्युत अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण वातावरणात ‘अक्षय ऊर्जा दिन’ साजरा झाला.
विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा, लघुचित्रफीत निर्मिती स्पर्धा आणि पोस्टर निर्मिती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अक्षय ऊर्जा, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, ऊर्जा बचत आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांवर आपले ज्ञान, कल्पकता व सर्जनशीलता सादर केली. अक्षय ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ प्रवीण कुमार वानखेडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाढती ऊर्जेची गरज, पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील वाढता ताण, अक्षय ऊर्जेची भविष्यातील भूमिका तसेच या क्षेत्रातील रोजगार, संशोधन, नवकल्पना आणि उद्योजकतेच्या विविध संधी याविषयी सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. महल्ले, विद्युत अभियांत्रिकी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. एम. व्ही. जपे, प्राध्यापक समन्वयक डॉ. पी. पी. बेडेकर आदी यावेळी उपस्थित होते.
महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांच्या सहभागातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देत अक्षय ऊर्जेचा अधिकाधिक वापर, ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचविले. विद्यार्थ्यांनी ऊर्जा संवर्धनाची शपथ घेतली तसेच विविध विभागांमध्ये जनजागृतीपर पोस्टर्स लावून ऊर्जा बचतीचा आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापराचा संदेश दिला.