गंभीर नवजात बालकांना तातडीने दाखल करून मोफत उपचारांचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, August 30, 2026

गंभीर नवजात बालकांना तातडीने दाखल करून मोफत उपचारांचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश



 

*आगीच्या घटनेनंतर उपाययोजना

अमरावती, दि. ३१ ( **ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क* *) : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. या दुर्घटनेमुळे अतिदक्षता वार्डचे मोठे नुकसान झाले असून, पर्यायी व्यवस्था होईपर्यंत नवजात बालकांच्या उपचारात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांना निर्देश जारी केले आहेत.

 

जिल्हा स्त्री रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयातून पाठवण्यात आलेल्या गंभीर नवजात बालक व बालरुग्णांना उपलब्ध अतिदक्षता विभागात बेडनुसार तातडीने दाखल करून जीवनावश्यक उपचार सुरू करावेत. केवळ पैशांअभावी किंवा आर्थिक कारणांमुळे कोणत्याही गंभीर रुग्णावर उपचार रोखू नयेत किंवा दाखल करण्यास नकार देऊ नये. प्रथम रुग्णाची स्थिती स्थिर करण्याला प्राधान्य द्यावे. तसेच पात्र रुग्णांना आयुष्मान भारत, मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय योजना यांसारख्या विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी रुग्णालयांनी नातेवाईकांना सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले आहे.

 

 

सदर आदेशांचे उल्लंघन केल्यास किंवा उपचारात जाणीवपूर्वक विलंब, टाळाटाळ केल्यास संबंधित रुग्णालय प्रशासन आणि जबाबदार व्यक्तींवर कडक प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता सर्व खासगी व शासकीय रुग्णालयांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला पूर्ण सहकार्य करावे, तसेच नवजात रुग्णांच्या जीवितास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आदेश देण्यात आले आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages