सफाई कामगारांना राखी बांधून संविधान मूल्यांचा संदेश - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, August 30, 2026

सफाई कामगारांना राखी बांधून संविधान मूल्यांचा संदेश

‘आम्ही भारताचे लोक’ उपक्रमातून स्वच्छता कामगारांचा सन्मान

अमरावती, दि. ३१ : रक्षाबंधनाच्या निमित्ताने शहरातील सफाई कामगार बांधवांना राखी बांधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. ‘आम्ही भारताचे लोक’ या उपक्रमांतर्गत संविधान जागर अभियान अमरावतीसह विविध सामाजिक संघटना व महिला बचत गटांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

अमरावती शहरातील नवसारी, दस्तूर नगर, फरशी स्टॉप, मिल चाळ, पंचशील नगर, रमाबाई आंबेडकर नगर, माताफैल तसेच बडनेरा परिसरातील सफाई कामगारांशी कार्यकर्त्यांनी संवाद साधत त्यांना राखी बांधली. शहराची स्वच्छता राखण्यासाठी दररोज काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या श्रमाबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमात जात, धर्म व पंथाच्या पलीकडे जाऊन संविधानातील समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही मूल्ये आचरणात आणण्याचा संदेश देण्यात आला. रक्षाबंधन केवळ कौटुंबिक नात्यापुरते मर्यादित न ठेवता समाजातील कष्टकरी घटकांशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते निर्माण करण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान सफाई कामगार व नागरिकांशी संवाद साधून संविधानाबाबत जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच व्यसनमुक्ती याबाबत माहिती देण्यात आली. अंधश्रद्धांना बळी न पडता विवेकवादी व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमाचे आयोजन संविधान जागर अभियान अमरावती, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती, महिला राजसत्ता आंदोलन, जनसेवा वस्ती स्तर संघ, संकल्प वस्ती स्तर संघ, बुद्धछाया वस्ती स्तर संघ आणि महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी साथी विजय डवरे, प्रफुल्ल मंदा श्रीधर, किरण दुपारे, सीमा मडामे, उषा कोठार, नंदा गुप्ता, वर्षा पकडे, नूतन वासनिक, निलू मेश्राम, अनुपमा गोंडाने, कुंदा मेश्राम, वैशाली राऊळ, सुरेखा तायडे, रंजना भजगवरे, प्रतिभा खापरे, दिलीप लाडे, आशिष देशमुख यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला बचत गटांच्या सदस्यांची उपस्थिती होती.

या उपक्रमाचे संयोजन संविधान जागर अभियानचे साथी विजय डवरे व बबिता वानखडे यांनी केले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages