अमरावती, दि. २९ (*ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क*): पर्यटन संचालनालय प्रादेशिक, अमरावती अंतर्गत अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषी पर्यटन केंद्र संचालकांसाठी 18 ऑगस्ट 2026 रोजी "मामाचं वावर" कृषी पर्यटन केंद्र, मौजे वळती, ता. चिखली, जि. बुलढाणा येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागातील विविध जिल्ह्यांतून आलेले कृषी पर्यटन केंद्र संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालयाचे उपसंचालक विजय जाधव, शाश्वत विकास केंद्र (अमरावती) चे गणेश चौधरी, कृषी पर्यटन केंद्र संचालक समिती (महाराष्ट्र राज्य) चे अध्यक्ष लहू अवताडे आणि कॅनव्हास फाउंडेशन, द चॅरिटेबल ट्रस्ट (अमरावती) चे आशिष शेरेकर उपस्थित होते.
या कार्यशाळेत उपसंचालक विजय जाधव यांनी महाराष्ट्राचे पर्यटन धोरण 2024 अंतर्गत कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, प्रोत्साहन, होमस्टे, पर्यटन व्हिला, व्हॅकेशन होम अशा अधिकृत नोंदणी प्रक्रिया आणि कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा आर्थिक विकास कसा साधता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आजच्या डिजिटल युगात ए.आय चा वापर कसा करता येईल यावरही त्यांनी प्रकाश टाकला. गणेश चौधरी यांनी कृषी पर्यटन केंद्र चालवताना निसर्गाचा समतोल राखून शाश्वत विकासाची कास कशी धरावी आणि स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर कसा करावा, याबद्दल तांत्रिक व व्यावहारिक माहिती दिली.
अध्यक्ष लहू अवताडे यांनी राज्यातील कृषी पर्यटनासमोरील आव्हाने, संचालकांचे संघटन आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोन कसा असावा, यावर आपले अनुभव अभ्यासपूर्ण रितीने मांडले. तसेच शाळेच्या सहली व शासनाच्या विविध विभागांशी कसा समन्वय साधता येईल यावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी अमरावती विभागातील विजय श्रीराव (महेंद्री कृषी पर्यटन केंद्र, वरुड), सुनील वारे (वनश्री कृषी पर्यटन केंद्र, उदखेड) तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील मातोश्री कृषी पर्यटन केंद्र (अंबड) आणि श्री गोकुळ कृषी पर्यटन केंद्र (जालना) येथील संचालकांनी आपले अनुभव सांगितले.
या एक दिवसीय कार्यशाळेमुळे अमरावती व छत्रपती संभाजीनगर विभागातील कृषी पर्यटन केंद्र संचालकांना केंद्राचा दर्जा उंचावण्यासाठी नवीन नियमावली समजून घेण्यास व नवनवीन संकल्पना राबवण्यास मोठी दिशा मिळाली आहे. "मामाचं वावर" चे संचालक मोहन तेजराव जगताप यांच्या सहकार्याने सर्व संचालकांनी निसर्गरम्य वातावरणात वनभोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'पर्यटन मित्र' शिवाजी गायकवाड यांनी केले, तर प्रादेशिक कार्यालय अमरावतीचे उपलेखापाल राजेश मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले.