अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार न्यायालयाने चेक बाऊन्स (धनादेश अनादर) प्रकरणी एका आरोपीला दोषी ठरवत ४ महिन्यांची कारावासाची शिक्षा आणि २ लाख ६५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा निर्णय 'पत्रकार व नागरिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था लि., शिरजगाव कसबा' यांच्या फिर्यादीवरून देण्यात आला आहे. न्यायालयाने दंडाची ही रक्कम थेट फिर्यादी पतसंस्थेला देण्याचे आदेश दिले आहेत.
चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा येथील रहिवासी आरोपी मकसूद खा शब्बीर खा यांनी १० ऑक्टोबर २०१४ रोजी 'पत्रकार व नागरिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था लि., शिरजगाव कसबा' येथून १ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.
कर्ज घेतल्यानंतर आरोपीने कर्जाची नियमित परतफेड केली नाही. त्यामुळे थकीत रक्कमेच्या वसुलीसाठी आरोपीने पतसंस्थेला एक धनादेश (चेक) दिला होता. पतसंस्थेने हा धनादेश बँकेत वटवण्यासाठी सादर केला असता, खात्यात अपुरा निधी (Insufficient Funds) असल्यामुळे तो अनादरित (बाऊन्स) झाला.
चेक बाऊन्स झाल्यानंतर पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार पोकळे व शाखा व्यवस्थापक सुनील राऊत यांनी आरोपीविरुद्ध चांदूर बाजार न्यायालयात धनादेश अनादराचा फौजदारी खटला दाखल केला.
या प्रकरणात दोन्ही बाजूंचे साक्षीपुरावे आणि कायदेशीर युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर, प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (कोर्ट क्रमांक ३) चांदूर बाजार येथील न्यायाधीश एच. एस. सोनार यांनी आरोपीला दोषी ठरवले
न्यायालयाने आरोपी मकसूद खा यांना ४ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली, तसेच २,६५,००० रुपये दंड ठोठावला. हा दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेची तरतूद आहे. दंडाची संपूर्ण रक्कम फिर्यादी पतसंस्थेला देण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
पतसंस्थेच्या वतीने ॲड. सचिन एस. यावले यांनी प्रभावीपणे बाजू मांडली.
न्यायालयाच्या या कडक निर्णयामुळे धनादेश अनादराच्या प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहारातील शिस्त आणि कायद्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.