सहा संस्थांमधील 117 जागांसाठी संधी
अमरावती, दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती विद्यार्थी विकास विभाग,कौशल्य विकास विभागीय आयुक्तालय अमरावती आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी निवडीसाठी 18 ऑगस्ट 2026 रोजी स्वामी विवेकानंद विद्यार्थी भवन अमरावती विद्यापीठ परिसर येथे 'पं. दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या'चे आयोजन करण्यात आले आहे. एकूण सहा संस्थांमधील 117 जागांसाठी विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे.
या रोजगार मेळाव्यात आदित्य अनधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. ५० पदांसाठी, अभिनंदन को-ऑपरेटिव्ह बँक लि. ७ पदांसाठी, जिजाऊ कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लि. १५ पदांसाठी, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स प्रा. लि.१५ पदांसाठी, क्रेडिट एक्सेस ग्रामीण लि. १५ पदांसाठी आणि श्रीराम फायनान्स लि. १५ पदांसाठी अशा एकूण सहा कंपनी व बँकांचे प्रतिनिधी वेगवेगळ्या पात्रतेच्या पदाकरिता उपस्थित सुशिक्षित तरुणांची मुलाखत घेऊन निवड करणार आहेत. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरी व प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.
जिल्ह्यातील युवक युवतींसाठी रोजगाराची ही उत्तम संधी असून जास्तीत-जास्त उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यास आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन, कौशल्य विकास विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त द.ल.ठाकरे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहायक आयुक्त अभिषेक ठाकरे यांनी केले आहे. उमेदवारांना कुठलाही प्रवास भत्ता दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मेळाव्यात सहभागी होण्यासाठी काही अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066/7620 560 125/898341 9799/8446158 297 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे असे सांगण्यात आले आहे.
0 Comments