-राज्य सेवा हक्क आयुक्त अरूण डोंगरे
अमरावती, दि.१३(ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): नागरिकांना शासनाच्या सेवा विहित कालावधीत मिळाव्यात यासाठी सेवा हमी हक्क कायदा राज्यात लागू झालेला आहे. शासनच्या बहुतांश सेवा ऑनलाईन आणि या कायद्यामध्ये आणण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या सेवा विहित कालावधीत देण्यात याव्यात, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त अरूण डोंगरे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हमी हक्क कायद्यातील अधिसूचित सेवांचा आढावा दि.७ जुलै ला घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आदी उपस्थित होते.
श्री. डोंगरे यांनी विभागनिहाय प्रत्येक सेवांचा आढावा घेतला. सध्या शाळा सुरू झालेल्या असल्यामुळे शैक्षणिक कागदपत्रांमध्ये जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आदी कागदपत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज सादर केले जातात. त्यामुळे हे सर्व अर्ज डॅशबोर्डवर नोंदविण्यात यावेत. तसेच दिलेल्या कालावधीत अर्ज निकाली काढावेत. या डॅशबोर्डवर प्रत्येक अर्जाची नोंद होत असून निकाली काढण्याचा कालावधी दिसून येत असल्याने कार्यालय प्रमुखांनी यावर लक्ष ठेवावे.
जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांनी अधिनस्त कार्यालयांकडे प्रलंबित असलेल्या अर्जांचा आढावा घ्यावा. जिल्हा परिषदेत विभागाची स्वतंत्र ऑनलाईन अर्जाची यंत्रणा आहे. तरीही सेवा हमी हक्कच्या माध्यमातून आलेल्या अर्जावर तातडीने कार्यवाही करावी. याची नोंद पोर्टलवर करण्यात यावी. सेवा हक्क हमी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत दर तीन महिन्यांनी आढावा घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा आणि कार्यालय पातळीवर सेवांच्या कालवधीची अंतिम मुदत लक्षा घेऊन अर्ज निकाली काढण्यात यावेत, अशा सूचनाही श्री. डोंगरे यांनी दिल्या.