जनजागृती व पेन्शन अदालत संपन्न
अचलपूर, दि.१३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): जिला कोषागार कार्यालय, अमरावती यांच्या वतीने अचलपूर येथे 'महाउपलब्धी अॅप' जनजागृती आणि पेन्शन अदालत कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा कोषागार कार्यालयाचे वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अप्पर कोषागार अधिकारी जयश्री उताणे, अचलपूरचे उपकोषागार अधिकारी अरविंद शेंडे, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. चौधरी व कोषाध्यक्ष श्री. रुणवाल उपस्थिती होते.
कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी 'महाउपलब्धी अॅप'च्या विविध डिजिटल सेवांची माहिती देऊन त्याचे प्रात्यक्षिक सादर केले. या अॅपमुळे पेन्शनधारकांना दरमहाची पेमेंट हिस्ट्री , इन्कम सर्टिफिकेट/फॉर्म-16, ई-पीपीओ लायब्ररी, डिजिटल लाइफ सर्टिफिकेट आणि पेन्शनविषयक शासकीय निर्णय यांसारख्या महत्त्वाच्या सुविधा आता घरबसल्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पेन्शन अदालतीमध्ये पेन्शनधारकांच्या विविध समस्यांचे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निरसन केले. अनेक क्लिष्ट प्रकरणांवर जागेवरच सकारात्मक निर्णय घेऊन सेवानिवृत्तांना दिलासा देण्यात आला, तर उर्वरित तांत्रिक प्रकरणांवर तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणरआहे.
या कार्यक्रमाला दोन्ही कोषागार कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी, अचलपूर परिसरातील पेन्शनधारक उपस्थित होते.