अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिकतर्फे राज्यातील 25 गावांमध्ये आदि ग्राम पर्यटन योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आमझरी आणि खटकाली (ता. चिखलदरा) दोन गावाची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही गावांना शबरी महामंडळ महाव्यवस्थापक जयरेखा निकुंभ यांनी भेट दिली.
या भेटीदरम्यान होमस्टे लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. तसेच मध्यप्रदेशातील अभ्यास दौऱ्यास भेट दिलेल्या लाभार्थ्यांकडून त्यांच्या अनुभवाची माहिती जाणून घेण्यात आली. त्यानुसार स्थानिक पर्यटन विकास, पर्यटकाभिमुख सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच होमस्टेच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपाययोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शबरी आदि पर्यटन योजनेंतर्गत होमस्टेसाठी निवड करण्यात आलेल्या जागांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक पायाभूत सुविधा, पर्यटनक्षम वातावरण यावर आढावा घेण्यात आला. तसेच प्रकाश होमस्टे येथे भेट देऊन कॉफी प्लॉटची पाहणी करण्यात आली. परिसरातील नैसर्गिक पर्यटन क्षमता, उपलब्ध सुविधा व पर्यटन विकासाच्या दृष्टीने चर्चा करण्यात आले.
लाभार्थ्यांना शबरी आदि पर्यटन योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मंजूर कॉर्पस निधीचा उद्देशपूर्ण आणि नियमानुसार वापर करण्याबाबत लाभार्थ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. होमस्टे विकास, परिसर स्वच्छता, पर्यटकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करणे, स्थानिक संस्कृतीचे जतन व रोजगारनिर्मिती या बाबींवर विशेष भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी प्रकल्प व्यवस्थापक राजेश पवार, प्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनवणे, शाखा व्यवस्थापक गणेश साखरे, सल्लागार उपजीविका मनोहर मोहिते, प्रकल्प समन्वयक सचिन देशमुख, सुनील जांबेकर, ग्राम समन्वयक वासुदेव हेकडे आदी उपस्थित होते.