अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या सेवेतील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी असलेले महा-उपलब्धी हे ॲप माहिती आणि सुविधांचे माहेरघर सिद्ध होत आहे. या मोबाईल ॲपची माहिती, तसेच पेंशनधारकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयातील जिजाऊ सभागृहात पेन्शन अदालत पार पडली.
यावेळी सहाय्यक संचालक दीपक भिलपवार, सहाय्यक संचालक प्रल्हाद तुमने, अप्पर कोषागार अधिकारी जयश्री उताणे, वीरेंद्र दीक्षित प्रमुख उपस्थित होते.
निवृत्तीवेतन कोषागार अधिकारी अमोल इखे यांनी, 'महा-उपलब्धी' ॲपमुळे निवृत्तीवेतनधारकांना दरमहाची पेमेंट हिस्ट्री, इन्कम सर्टिफिकेट, फॉर्म-१६, ई-पीपीओ लायब्ररी, ह्यातीचा दाखला आणि निवृत्तीवेतनविषयक शासन निर्णय आदी सुविधा उपलब्ध होत आहे. वरिष्ठ कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांनी जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या मोबाईल ॲपचा उपयोग करण्याचे आवाहन केले.
कनिष्ठ लेखापाल लुकेश मोहोरे व आदित्य सुरजुसे यांनी लाइव्ह प्रोजेक्टरद्वारे ‘महा-उपलब्धी’ ॲपमधील डिजिटल सेवांचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच लेखालिपिक कोमल गोसावी यांनी निवृत्तीवेतनधारकांचे मोबाईल क्रमांक निवृत्तीवेतन वाहिनीवर अद्यावत करण्यासाठी 'महाकोष' पोर्टलवर स्वतःचे लॉगिन करून मोबाईल क्रमांक अपडेट करण्याविषयी माहिती देणारा व्हिडिओ सादर केला.
पेंशन अदालतीमध्ये उपस्थित निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या व तक्रारींचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निरसन केले. अनेक क्लिष्ट प्रकरणांवर जागेवरच सकारात्मक निर्णय घेऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला.
कनिष्ठ लेखापाल नयना सोलव यांनी प्रास्ताविकातून निवृत्तीवेतनाबाबत शासन निर्णय आणि इतर सुविधांबाबत कोषागार कार्यालयाची भूमिका विषद केली. कनिष्ठ लेखापाल श्रुतिका तडस यांनी सूत्रसंचालन केले. कनिष्ठ लेखापाल साजिया मोहम्मद यांनी आभार मानले.
कार्यक्रमासाठी वरिष्ठ लेखापाल राम जाधव, यामिनी खरड, कनिष्ठ लेखापाल चंदन गजभिये, लेखालिपिक मनीषा भालचक्रे, वर्षा नावाडे यांनी पुढाकार घेतला.