सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडीसाठी विशेष लोकअदालत;


21 ते 23 ऑगस्ट दरम्यान 'समाधान समारोह'

अमरावती, दि.१३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): न्यायप्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवून 'न्याय आपल्या दारी' ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयामार्फत 'समाधान समारोह' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा समारोप येत्या 21 ते 23 ऑगस्ट 2026 रोजी आयोजित विशेष लोकअदालतीने होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा संमती-आधारित प्रक्रियेद्वारे, सलोख्याने व जलद गतीने निपटारा करणे हा या विशेष लोकअदालतीचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून पक्षकारांना दीर्घकालीन न्यायप्रक्रियेतून मोठा दिलासा मिळणार असून, परस्पर सहमतीने वाद मिटविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व वकील, पक्षकार तसेच संबंधित हितधारकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून वादांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय सहारे यांनी केले आहे. या विशेष लोकअदालतीत पक्षकारांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याबरोबरच, आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने ऑनलाइन सहभागी होण्याची विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पक्षकार घरबसल्या किंवा आपल्या सोयीनुसार या प्रक्रियेत सामील होऊ शकतात. या संधीचा  जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी व पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संजय सहारे यांनी केले आहे.


Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday