24 जुलैपर्यंत मोफत अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. १३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत पारधी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी 'पारधी पॅकेज योजना सन 2025-26' जाहीर करण्यात आली असून, या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून विनामूल्य अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ केवळ अनुसूचित जमातीमधील पारधी व फासे पारधी समाजातील घटकांनाच घेता येणार आहे. या विशेष पॅकेजअंतर्गत प्रामुख्याने शहरी तसेच ग्रामीण भागातील पारधी समाजाच्या गरजू लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे, यासाठी घरकुल बांधकामाकरिता विशेष अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या भौगोलिक रचनेनुसार अर्ज वाटप आणि स्वीकृती केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी व अचलपूर तालुक्यातील लाभार्थ्यांनी धारणी येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयात संपर्क साधायचा आहे. तसेच नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील नागरिकांनी अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती यांच्या कार्यालयात आणि मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांनी धारणी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोर्शी येथील उप कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या योजनेचे अर्ज पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 24 जुलै 2026 ही राहणार आहे.
योजनेच्या पारदर्शकतेसाठी प्राप्त सर्व अर्जांची प्रथम संगणकीय यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर सर्व कागदपत्रांची तपासणी करून पात्र व अपात्र उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली जाईल व अंतिम निवड 'ईश्वर चिठ्ठी' (लकी ड्रॉ) पद्धतीने होईल. लाभार्थी निवडताना समाजातील सर्वात गरजू घटकांचा विचार केला जाणार असून यामध्ये दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) लाभार्थी, दिव्यांग व्यक्ती आणि विधवा महिलांना प्रामुख्याने प्रथम प्राधान्य दिले जाईल. या योजनेच्या अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी संबंधित कार्यालयातील विकास शाखेशी किंवा 07226-224217 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी कळविले आहे.