'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' ठरली बनावट; सोशल मीडियावरील 'त्या' पत्रकावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, July 22, 2026

'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' ठरली बनावट; सोशल मीडियावरील 'त्या' पत्रकावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन



दि. 22 :-

 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पत्रक पूर्णपणे बनावट (फेक) असून महाराष्ट्रात अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण विभागाने दिले आहे. 

 सोशल मीडिया (फेसबुक आणि व्हॉट्सॲप) वर एक पत्रक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये दावा केला गेला आहे की, १ मार्च २०२० नंतर पालकांचा मृत्यू झालेल्या इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ४,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

 या कथित योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून रेशन कार्ड, आधार कार्ड, शाळेचे ओळखपत्र, मृत्यू प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला अशी वैयक्तिक कागदपत्रे गोळा करण्याचे आवाहन केले जात होते. काही ठिकाणी शाळांमार्फतही ही माहिती मागवली गेल्याने पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

 महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी (पैठण) करुणा कोकणे आणि संरक्षण अधिकारी पूनमसिंग बमनात यांनी स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' नावालेली कोणतीही योजना राबवली जात नाही.

राज्य शासनातर्फे 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना' सुरू आहे. या खऱ्या योजनेअंतर्गत पात्र एकल (अनाथ/एका पालकाचा मृत्यू झालेल्या) बालकांना दरमहा २,२५० रुपये दिले जातात. 

प्रशासनाने नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी खालील महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत:
 सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही अनधिकृत पत्रकांवर किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर त्वरित विश्वास ठेवू नका.
कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद संस्थेकडे आपली अथवा पाल्याची वैयक्तिक व गोपनीय कागदपत्रे जमा करू नका.
शासकीय योजनांची माहिती मिळाल्यास संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला (वेबसाइटला) भेट द्या, किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, महिला व बालविकास कार्यालयात जाऊन खात्री करा.
अशा प्रकारची खोटी, अप्रमाणित आणि दिशाभूल करणारी पत्रके किंवा संदेश पुढे (फॉरवर्ड) पाठवणे टाळा.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages