लोकनेता स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती प्रित्यर्थ "जनसेवा सप्ताह " अंतर्गत आयोजन
अमरावती( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) दिनांक -२२ जुलै :- दरवर्षी २२ जुलै रोजी अजितदादा पवार यांचा वाढदिवसानिमित्य अमरावती शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. आज अजितदादा पवार आपल्यात नाही आहे. परंतु विकासाच्या प्रत्येक पाऊलावर अजितदादांच्या कामांची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्याचे नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्य बुधवार दिनांक २२ जुलै ते सोमवार दिनांक २७ जुलै २०२६ या कालावधीत "जनसेवा सप्ताह " निमित्याने लोकोपयोगी व समाजहिताचे विविध कार्यक्रम हाती घेऊन राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत येत्या रविवार दिनांक २६ जुलै २०२६ रोजी अमरावती येथे वर्ष २०२६ मधील दहावी -बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत - यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा स्थानिक श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड अमरावती येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष - यश सुलभा संजय खोडके यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.
यावर्षी स्व. अजितदादा पवार यांची जयंती समर्पण, सेवा आणि संकल्प या भावनेतून साजरी होत असून अमरावतीच्या आमदार सौ.सुलभाताई खोडके यांच्या संकल्पनेतून शहरात "ग्रीन अमरावती" ही संकल्पना राबवून २५ हजार वृक्ष लागवड हा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धन व आरोग्याचे संरक्षण होण्याकरिता एक लोकचळवळ निर्माण करण्याचा संकल्प या माध्यमातून करण्यात आला आहे. शहरातील वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ २२ जुलै रोजी शासकीय आयटीआय संस्था अमरावती येथून करण्यात येणार असून त्यानंतर जनसेवा सप्ताह अंतर्गत शहरात २५ हजार वृक्ष लागवड अभियान मोठ्या प्रमाणात राबविले जाणार असल्याची माहिती सुद्धा पत्रकार परिषदेतून देण्यात आली.
पत्रकार परिषदेत माहिती देतांना शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष - श्री. यश सुलभा संजय खोडके यांनी सांगितले की , गेल्या वर्षी सुद्धा अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी -बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. दहावी -व बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला नवे वळण देत असून येथूनच खरी उच्च शिक्षणाची व करियरची दिशा मिळते. म्हणून वर्ष २०२६ च्या दहावी -बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले सुयश हे त्यांच्या जिद्द , मेहनत व परिश्रमाचे फलित असून त्यांचा सत्कार करून प्रोत्साहित करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. याच उदात्त भावनेतून सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून एका महिन्यापासून जय्यत तयारी करण्यात आली असून शोध प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमरावती महानगरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून ७५ टक्केहुन अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांची यादी प्राप्त करण्यात आली. तसेच परिचित व्यक्तीकडूनही त्यांच्या भागातील विद्यार्थ्यांची नावे सुचविण्यात आली असल्याने बहुसंख्य गुणवंत विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करण्यात आली आहे. तसेच त्यांना कार्यक्रमासंदर्भातही कळविण्यात आले असून कार्यक्रमस्थळी सुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीसाठी स्टॉल लावण्यात येईल. या सोहळ्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू ,प्रशस्तीपत्र तसेच वृक्ष देऊन गौरविण्यात येणार असून भविष्यातील शैक्षणिक वाटचाल व शिक्षणाच्या नवनवीन संधी याबाबत सुद्धा मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. वर्ष २०२६ मधील इयत्ता दहावी व बारावीतील ७५ टक्के हुन अधिक गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी या सत्कार सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शोध प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष - यश सुलभा संजय खोडके यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे.
पत्रकार परिषदेला शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष - यश खोडके यांच्या समवेत मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती शहराध्यक्ष - प्रशांत डवरे, माजी महापौर - अँड. किशोर शेळके, मनपा महिला व बाल कल्याण सभापती- ममताताई आवारे, तसेच मनपा नगरसेवक चंदू खेडकर , प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, प्रमोद महल्ले, मनीष बजाज, रतन डेंडूले, मिनल योगेश सवई, अर्चना मनीष पाटील, माजी नगरसेवक भूषण बनसोड, अँड सुनील बोळे, भास्करराव ढेवले, किशोर भुयार, किशोर देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष - ऋतुराज राऊत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष - संकेत बोके, आकाश हिवसे, अभिषेक हजारे , अभिमन्यू तायवाडे, जयेश सोनोने, मनीष पाटील आदींसह सर्व सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
२२ जुलै ते २७ जुलै पर्यंत शहरातील प्रभागा-प्रभागात भरगच्च कार्यक्रम व सेवाभावी उपक्रम*
पत्रकार परिषदेत सांगण्यात आले कि, दिवंगत लोकनेता - अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा साजरा होणाऱ्या 'जनसेवा सप्ताह 'अंतर्गत कार्यकर्तास्तरावर सुद्धा प्रभागा-प्रभागामध्ये सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहे. ज्यामध्ये २२ जुलै रोजी मनपा स्थायी समिती सभापती -अविनाश मार्डीकर यांच्या प्रभाग क्रमांक- १० च्या वतीने जुना बायपास मार्ग स्थित सखा मंगलम येथे भव्य रक्तदान शिबिर, तसेच मनपा महिला व बालकल्याण सभापती - ममताताई आवारे यांच्या वतीने महिलांना शिलाई मशीन वाटप कार्यक्रम. त्यानंतर शासकीय आयटीआय परिसर येथे वृक्षारोपण कार्यक्रम. सायंकाळच्या सत्रात पीडीएमसी परिसरात रुग्ण व नातेवाइकांकरिता भोजन वाटप कार्यक्रम, २३ जुलै रोजी चिलम छावणी तपोवन रोड तसेच अंबापेठ येथे एस.टी. बस एन.सी.एम.सी कार्ड शिबीर, तसेच पीडीएमसी रुग्णालयात स्नेहभोजन कार्यक्रम, २४ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात फळ वाटप, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल येथे भोजन वाटप कार्यक्रम होणार आहे. तर २५ जुलै रोजी श्री संत सांस्कृतिक भवन, अमरावती येथे शासनाचे वतीने महाराजस्व अभियान राबविण्यात येईल, याच शृंखलेत महेंद्र कॉलनी परिसरात आरोग्य तपासणी शिबीर , तर २६ जुलै रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, २७ जुलै रोजी विलास नगर स्थित स्मशानभूमी येथे भव्य वृक्ष लागवड अभियान , मृगेंद्र मठ अंबागेट येथे भव्य रक्तदान शिबीर, तसेच युसूफ पॅलेस वलगांव रोड येथे राशन कार्ड शिबीर व एस.टी. बस ने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एनसीएमसी कार्ड शिबीर राबविण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी वृक्षारोपण व वृक्ष रोपटे वाटप सुद्धा केले जाणार असून कार्यकर्तास्तरावर सुद्धा वृक्षारोपण कार्यक्रम, रुग्णांना फळवाटप कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे सुद्धा पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले आहे .