मतदारयादीत नाव कायम ठेवण्यासाठी विशेष मोहीम



*गणनापत्रक भरून देण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारत निवडणूक आयोगामार्फत मतदारयादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पूर्णपणे नव्याने मतदारयादी तयार करण्यात येणार आहे. मतदारयादीत नाव कायम ठेवण्यासाठी दि. 24 ते 26 जुलैदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी मतदानकेंद्रावर जाऊन गणनापत्रक भरून द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

मतदारांनी गणनापत्रक भरून दिले नसल्यास त्यांची नावे आगामी प्रारूप मतदारयादीमधून वगळल्या जातील. त्यामुळे मतदारांनी वेळेत हे पत्रक जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित मतदारांचे नाव मतदारयादीत यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. शुक्रवार, दि. 24 जुलै ते रविवार, दि. 26 जुलै दरम्यान दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्व संबंधित विधानसभा मतदान केंद्रे ही विशेष मोहिम राबविली जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी गेल्या 2024 मधील विधानसभा निवडणुकीत ज्या केंद्रावर मतदान केले आहे, त्याच ठिकाणी उपस्थित राहावे लागणार आहे. उपस्थित बीएलओकडून गणनापत्रक प्राप्त करून घ्यावे, तसेच सदर अर्ज पूर्ण भरून बीएलओकडे त्वरित जमा करावे. यामुळे मतदार यादीत मतदारांचे नाव समाविष्ट होण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही.

जिल्ह्यातील एकूण 25 लाख मतदारांपैकी सुमारे 16 लाख मतदारांनी आपले गणनापत्रक भरून दिले आहे. उर्वरीत 9 लाख मतदारांनी संबंधित 'बीएलओ' यांच्याकडे गणनापत्रक जमा केलेले नाही. त्यामुळे मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवणे आणि एकही मतदार वगळला जाऊ नये, यासाठी सर्व मतदारांनी तातडीने गणनापत्रक भरून देऊन या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.


Previous Post Next Post

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday