*अंतिम यादी 19 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार
अमरावती, दि. २३ :पावसामुळे मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या घरोघरी भेटी व गणना कार्यात अडथळे निर्माण झाले आहेत. नागरिकांची व प्रशासकीय यंत्रणेची गैरसोय टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विशेष सखोल पुनरीक्षण 2026 चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आता अंतिम यादी दि. 19 ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी हे सुधारित वेळापत्रक जाहिर केले आहे. दि. 1 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारीत ही सुधारीत मतदारयादी तयार करण्यात येत आहे. यात 30 जून ते 8 ऑगस्ट दरम्यान बीएलओमार्फत घरोघरी भेटी, 8 ऑगस्टपर्यंत मतदानकेंद्रांचे सुसूत्रीकरण, पुनर्रचना, 17 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी, 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहे. 17 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबरपर्यंत नोटीस कालावधी, दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहे. 19 ऑक्टोबर, 2026 रोजी मतदारयादीची अंतिम प्रसिद्धी होणार आहे.
मतदार यादीतील दुबार नावे वगळणे, मयत व्यक्तींची नावे कमी करणे आणि नवीन पात्र मतदारांचा समावेश करून अचूक व पारदर्शक मतदारयादी तयार करण्यासाठी ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
सर्व मतदारांनी बीएलओकडे विहीत नमुन्यातील गणना अर्ज मुदतीत सादर करावा. तसेच दि. 17 ऑगस्ट रोजी प्रारूपयादी प्रसिद्ध झाल्यावर आपले नाव तपासून घ्यावे आणि दावे किंवा हरकती असल्यास दि. 16 सप्टेंबर 2026 पर्यंत दाखल करावे. तसेच सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रासाठी 'बूथ लेव्हल एजंट'ची नियुक्ती करून या पुनरीक्षण कार्यात प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.