*कृषी विभागाचे आवाहन
अमरावती, दि. 10 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय कृषि विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ अंतर्गत जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचा समावेश करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ठिबक व तुषार सिंचन संचाच्या खरेदीसाठी विविध योजनांच्या समन्वयातून तब्बल 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
योजनेंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना विविध टप्प्यात पूरक अनुदान देऊन आर्थिक दिलासा दिला जात आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना 55 टक्के, तर इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान दिले जाते. मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेच्या माध्यमातून अल्प व अत्यल्प भूधारक लाभार्थ्यांना 25 टक्के, तर इतर लाभार्थ्यांना 30 टक्के पूरक अनुदान मिळते. तसेच जिल्हा परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन मिशन योजना आणि बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेमधून अल्प व अत्यल्प भूधारकांना 10 टक्के, तर इतर लाभार्थ्यांना 15 टक्के पूरक अनुदान दिले जाते.
इच्छुक शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकी हक्काचा सातबारा आणि आठ अ उतारा असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे शेतीसाठी ओलिताची सोय असणे बंधनकारक आहे. या सिंचन योजनेचा लाभासाठी पात्र व इच्छुक लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
जिल्ह्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments