पाच वर्षांखालील बालकांमधील डायरियामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी स्टॉप डायरिया अभियान १६ जूनपासून सुरू होणार आहे. डायरिया, बाल आरोग्य आणि जनजागृती भर.
दि. ९ अकोला:
डायरिया (जुलाब) हा लहान मुले आणि बालकांमध्ये आढळणारा गंभीर आजार असून विशेषतः पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छता आणि अपुरी स्वच्छता यामुळे त्याचे प्रमाण वाढते. या आजारामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊन निर्जलीकरणाची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाच वर्षांखालील बालकांमध्ये डायरियामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने ‘स्टॉप डायरिया अभियान’ राबविण्यात येत आहे.
हे अभियान १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. त्याआधी १ जून ते १५ जून या कालावधीत अभियानाच्या पूर्वतयारीचे काम सुरू असून यामध्ये कर्मचारी प्रशिक्षण, औषधसाठ्याची उपलब्धता, सर्वेक्षण, कृती आराखडा तयार करणे, लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच व्यापक जनजागृती कार्यक्रमांचा समावेश आहे.अभियानांतर्गत नागरिकांपर्यंत डायरियाबाबतची माहिती पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार असून शाळा, विविध संस्था तसेच इतर विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अभियानाचा संदेश घराघरात पोहोचविण्यात येणार आहे.या अभियानाचा मुख्य उद्देश पाच वर्षांखालील मुलांमधील डायरियामुळे होणारे मृत्यू शून्यावर आणणे हा आहे. त्यासाठी ओआरएस आणि झिंकचा वापर वाढविणे, स्वच्छ पाणी व स्वच्छतेच्या सवयींचा प्रसार करणे, डायरियाची लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत जनजागृती करणे तसेच आरोग्य सेवांची गुणवत्ता आणि उपलब्धता वाढविणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
"स्वच्छता, सुरक्षित पाणी आणि ओआरएस हे डायरियाविरुद्धचे प्रभावी शस्त्र आहे. प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेचे नियम पाळून आणि डायरियाबाबत जागरूक राहून या अभियानाला यशस्वी बनवावे."
-डॉ. विनोद करंजेकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, अकोला
हे उपाय करा
डायरियापासून बचावासाठी नेहमी स्वच्छ व उकळलेले पाणी पिणे, जेवणापूर्वी आणि शौचालय वापरल्यानंतर साबणाने हात धुणे, अन्न झाकून ठेवणे, ताजे अन्न सेवन करणे, बालकांना स्तनपान देणे आणि लसीकरण वेळेवर करून घेणे आवश्यक आहे. डायरियाची लक्षणे दिसून आल्यास तातडीने ओआरएस आणि झिंकचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
योग्य उपचाराची गरज
डायरिया हा टाळता येण्याजोगा आजार असून योग्य वेळी उपचार, स्वच्छता आणि जनजागृतीच्या माध्यमातून हजारो बालकांचे प्राण वाचविता येऊ शकतात. ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यास हे अभियान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
Post a Comment
0 Comments