अमरावती, दि. ८ : जन्मजात पायाच्या विकाराविषयी जनजागृती निर्माण करणे, लवकर निदानाचे महत्त्व पटवून देणे आणि उपलब्ध मोफत उपचार सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे डीआयईसी विभाग व बालरोग विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक क्लब फूट दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
क्लब फूट हा जन्मजात पायाचा विकार असून यामध्ये बाळाचा एक किंवा दोन्ही पाय आत व खाली वळलेले असतात. हा विकार जन्मतःच दिसून येतो. मात्र योग्य वेळी निदान करून उपचार सुरू केल्यास बालकाला पूर्णपणे सामान्य जीवन जगणे शक्य होते.
जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे सन २०१९ पासून क्लब फूट उपचार कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन व प्युअर इंडिया संस्थेच्या संयुक्त विद्यमाने क्लब फूट बाधित बालकांना मोफत उपचार, समुपदेशन, आवश्यक साहित्य व नियमित फॉलोअप सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत ८८ क्लब फूट बाधित बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून अनेक बालकांना सामान्यपणे चालणे व दैनंदिन जीवन जगणे शक्य झाले आहे.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित पालकांना क्लब फूट विकार, त्याची कारणे, लक्षणे, उपचारपद्धती आणि उपचारांचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील ज्या बालकांना हा विकार आहे, त्यांच्या पालकांनी कोणतीही भीती अथवा आर्थिक चिंता न बाळगता जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे दर मंगळवारी ऑर्थोपेडिक विभागाच्या ओपीडी क्रमांक १० मध्ये उपस्थित राहून मोफत वैद्यकीय सल्ला व उपचारांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, क्लब फूट हा पूर्णपणे उपचारयोग्य विकार असून योग्य वेळी उपचार सुरू केल्यास बालकाचे आयुष्य सामान्य होऊ शकते. त्यामुळे अशा बालकांच्या पालकांनी वेळ न दवडता जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे संपर्क साधून उपलब्ध मोफत उपचार सुविधांचा लाभ घ्यावा. शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने या बालकांसाठी सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली जात आहे.
कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, आउटरीच आरएमओ श्री. हेडाऊ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोळंके, बालरोग विभाग प्रमुख डॉ. सोनाली शिरभाते, डॉ. नितीन दातीर तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय क्लब फूट बाधित बालके व त्यांच्या पालकांनी उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये क्लब फूट या विकाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासह, 'क्लब फूट म्हणजे अपंगत्व नव्हे; योग्य वेळी उपचार मिळाल्यास त्यावर प्रभावी मात करता येते' हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
Post a Comment
0 Comments