Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

माईंच्या "लेकी-जावयांचा सन्मान" सोहळ्यात उसळला भावनांचा महापूर

     

दिपकदादा यांच्याविषयी कृतज्ञतेची भावना व्यक्त
ममता सिंधुताई सपकाळ यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

 

सासवड, दि. ८ जून : पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी उभारलेल्या विशाल कुटुंबातील मायेचा, संस्कारांचा आणि  पुन्हा एकदा आला. ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण येथे अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “अधिक मासाचे वाण - माईंच्या लेकजावयांचा सन्मान” या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात भावनांचा अक्षरशः महापूर उसळला.

 

यावेळी पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सिंधुताई सपकाळ, कीर्ती, ज्योती, मंजुषा आणि गौरी यांनी अतिशय भावनाविवश होत आपल्या भावना व्यक्त केल्या. “माईंचे पहिले मानसपुत्र दीपकदादा गायकवाड हेच आमच्या सर्व लेकींसाठी खरे माहेर आहेत. दादा आजही कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारीने भूमिका पार पाडत आहेत. ते आम्हाला कधीच विसरत नाहीत, याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या लेकरांना त्यांच्या रूपाने प्रेमळ, कर्तृत्ववान आणि निरागस मनाचा मामा लाभला आहे. प्रत्येकाची मनापासून काळजी घेणारा असा भाऊ आजच्या युगात दुर्मिळ आहे,” असे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, तर भव्य मंडपातील अनेकांचे डोळेही पाणावले.

पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी १९९२ साली स्थापन केलेल्या ममता बाल सदन संस्थेत आजपर्यंत तब्बल २२० मुलींची थाटामाटात लग्ने लावून दिली आहेत. या सर्व लेकी आज आपल्या संसारात सुखाने नांदत असून माईंच्या कुटुंबात आज २२० लेक-जावयांचा मोठा परिवार निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेनुसार तीन वर्षांतून एकदा येणाऱ्या अधिक मासाला विशेष धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. याच परंपरेचे जतन करत माईंच्या संस्थेने “अधिक मासाचे वाण – माईंच्या लेकजावयांचा सन्मान” हा उपक्रम राबविला. या सोहळ्यासाठी लेकी व त्यांच्या जावयांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी जावयांना नवीन पोशाख, तर लेकींना साडी-चोळी, जोडवे (बिचवे), तामणदीप, निरंजन, ३३ अनारसे आणि तुळशीचे रोप अशा पारंपरिक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. ज्या प्रेमाने आणि आदराने प्रत्येक वडील अधिक मासात आपल्या लेकीला घरी बोलावून तिचा सन्मान करतात, त्याच संस्कृतीचे पालन करत ‘बापमाणूस’ म्हणून दीपकदादा गायकवाड यांनी माईंची परंपरा जिवंत ठेवली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ममता बाल सदन (बालगृह)चे अध्यक्ष दीपक गायकवाड होते. यावेळी सिंधुताई सपकाळ यांचे चिरंजीव अरुणभाऊ सपकाळ, लामा फेरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सत्येंद्र शुक्ला, शर्मिष्ठा जाधव, अनुश्री रिसवाडकर, शास्वती रिसवाडकर, बजरंग वाघ, चिंतामणी हॉस्पिटलचे डॉ. संजय रावळ, डॉ. दिलीप वाघोलीकर, डॉ. वांढेकर, डॉ. शेट्टी, अनिकेत खरे, पूजा खरे आणि शीतल सिनगारे, विनय सपकाळ, मनीष बोपटे, देविदास अरबट आदी मान्यवर उपस्थित होते. सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सन्मानपत्र आणि तुळशीचे रोप देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ममता बाल सदन संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. माईंच्या विचारांची, संस्कारांची आणि ममतेची परंपरा आजही तितक्याच ताकदीने पुढे चालत असल्याचे हे भावस्पर्शी चित्र पाहून उपस्थित प्रत्येकाचे मन भारावून गेले.

 


कृतज्ञता आणि अश्रूंच्या साक्षीने भारावला परिसर...

काही नाती रक्ताची नसतात, पण ती रक्ताच्या नात्यांपेक्षाही अधिक घट्ट असतात. काही घरे विटा-मातीची नसतात, ती मायेने उभी राहतात. आणि काही माहेरं आई गेल्यानंतरही संपत नाहीत. ती एखाद्या माणसाच्या रूपाने कायम जिवंत राहतात. ममता बाल सदन (बालगृह), कुंभारवळण येथे आज असेच एक भावविश्व उभे राहिले आणि संपूर्ण परिसर मायेच्या, कृतज्ञतेच्या आणि अश्रूंच्या साक्षीने भारावून गेला. माईंच्या जाण्यानंतरही त्यांचे कुटुंब विखुरले नाही; उलट मायेच्या धाग्यांनी आणखी घट्ट विणले गेले आहे. आणि त्या धाग्यांना जपणारे नाव म्हणजे दिपकदादा असे भाव, यावेळी उमटल्याचे दिसून आले.

चौकट

अनेक लोकप्रतिनिधींनी दिल्या भेटी...

अधिक मास सोहळ्यात माजी आ. अशोक टेकवडे, सासवडच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, सौ. राजवर्धिनीताई जगताप, जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे, रश्मी कोलते, हरिभाऊ लोळे, शशिकला विजय कोलते, न्यायालयाचे संजय खामकर, पंचायत समिती सभापती प्रवीण जगताप, जितेंद्र कांबळे, पांडुरंग भोसले, उद्योजक अजित गोळे, यांच्यासह जिल्हयातील अनेक लोकप्रतिनिधींनी सदिच्छा भेट देऊन लोकजावयांना आशीर्वाद दिले. एवढंच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. ठाणे येथील ८० वर्षीय रंजना गायकवाड यांनी सुद्धा सोहळ्यात उपस्थित राहून आशीर्वाद दिले. 

Tags

Post a Comment

0 Comments