अमरावती, दि. 10 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या निंभोरा येथे कार्यरत शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.
यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. 1, 2, 3), निंभोरा, अमरावती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (जुने नाव गुणवंत) शासकीय वसतिगृह, निंभोरा, अमरावती, संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, निंभोरा, अमरावती या वसतिगृहांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनातर्फे सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम hmas.mahait.org या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर, त्या अर्जाची प्रिंट डाऊनलोड करावी. डाऊनलोड केलेली प्रिंट घेऊन संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. कनिष्ठ महाविद्यालय आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: 15 जुलै असून प्रवेशाची पहिली यादी 31 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध केले जाणार आहे.
अधिक माहिती किंवा संपर्कासाठी विद्यार्थ्यांनी 9130948264 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच विद्यार्थ्यांनी मुदतीत आपले अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावेत, असे आवाहन गृहप्रमुख आणि गृहपाल यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments