*दर्यापूर विधानसभा मतदारसंघ सर्वात पुढे
अमरावती, दि. ९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील मतदारयाद्यांचे अचूक सक्षमीकरण आणि मतदार मॅपिंग मोहिमेने वेग घेतला आहे. 6 जून 2026 पर्यंत जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 89.72 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले आहे. यात दर्यापूर विधानसभा मतदार संघ 95.69 टक्क्यांसह सर्वात पुढे आहे.
जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदारसंघांपैकी दर्यापूर मतदारसंघ 95.69 टक्के मॅपिंगसह जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ धामणगाव रेल्वे 94.88 टक्केसह दुसऱ्या स्थानावर आहे. अमरावती विधानसभा मतदारसंघही 80.06 टक्के मॅपिंगसह प्रगती करीत आहे. जिल्ह्यातील एकूण 25 लाख 58 हजार 364 मतदारांपैकी 22 लाख 95 हजार 319 मतदार मॅपिंग पूर्ण झाले आहेत. उर्वरित 2 लाख 63 हजार 45 मतदारांचे मॅपिंग झालेले नाही.
नगरपालिका क्षेत्रात सरासरी 85.19 टक्के मॅपिंग पूर्ण झाले आहे. यात भातकुली नगरपालिका 95.57 टक्केसह सर्वात आघाडीवर आहे. जिल्ह्यातील मॅपिंगच्या प्रक्रियेत लक्षणीय वाढ झालेली आहे. 17 मार्च रोजी जिल्ह्याचे मॅपिंग 46.37 टक्के होते. यात आता जिल्हा आता 89.72 टक्केवर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रगती अमरावती मतदारसंघात झाली असून, तिथली टक्केवारी 28.03 टक्क्यांवरून 80.06 टक्के वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील उर्वरित 2 लाख 63 हजार 45 मतदारांचे मॅपिंग आणि त्रुटी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येत आहे. मतदारांनीही मॅपिंगच्या कार्यात सहकार्य करावे, बीएलओंकडून मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments