अधिक नफ्यासाठी आरोग्याशी खेळ; कॅल्शियम कार्बाईडयुक्त पिकवलेले आंबे बाजारात? - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, May 19, 2026

अधिक नफ्यासाठी आरोग्याशी खेळ; कॅल्शियम कार्बाईडयुक्त पिकवलेले आंबे बाजारात?


अन्न व औषध प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अळीमिळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

दि. १९  चांदूरबाजार (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
विदर्भात सध्या उष्णतेचा पारा ४६ अंशांच्या पुढे गेला असतानाच, चांदूरबाजार शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या मुखात 'गोड विष' जात असल्याची धक्कादायक शक्यता वर्तविली जात आहे. शहरात रासायनिक पद्धतीने कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे आणि केळी सर्रास विक्रीसाठी बाजारात आली आहेत. मात्र, या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन (FDA) विभाग पूर्णपणे डोळेझाक करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 'गोड विषाचा' काळा बाजार आणि प्रशासनाची सुस्ती
शहरातील मुख्य बाजारपेठ, चौक आणि रस्त्यांवर 'कॅल्शियम कार्बाईड' सारख्या अत्यंत घातक रसायनाचा वापर करून पिकवलेली फळे बिंधास्तपणे विकली जात आहेत. नैसर्गिकरीत्या फळे पिकवण्याची प्रक्रिया टाळून, अधिक नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी व्यापारी नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. विशेष म्हणजे, अन्न व औषध प्रशासनाचे विभागीय कार्यालय अवघ्या ३६ किलोमीटरवर जिल्ह्याच्या ठिकाणी असतानाही कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे 'एफडीए' विभाग केवळ नावापुरताच उरला आहे का, असा सवाल जनसामान्यांमधून विचारला जात आहे.
लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर जनतेचा प्रश्न
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र या विषयावर पूर्णपणे गप्प आहेत. "आमच्या आरोग्यावर संकट असताना आमचे नेते कुठे आहेत?" असा संतप्त प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे नियम डावलणाऱ्या रसायनयुक्त विक्रेत्यांचे धाडस अधिकच वाढले आहे.
🤮 आजारांचे सावट; रुग्णालयांमध्ये गर्दी
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर या रासायनिक फळांच्या सेवनामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या काळात शहरात आणि ग्रामीण भागात खालील आजारांच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे:
जुलाब (डायरिया)
अन्नबाधा (फूड पॉयझनिंग)
उलट्या व पोटाचे तीव्र विकार
📢 नागरिकांची प्रमुख मागणी
या रासायनिक फळांमुळे एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत तातडीने तपासणी मोहीम राबवावी, रसायन वापरणाऱ्या गोदामांवर छापे टाकावेत आणि दोषी विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी चांदूरबाजार व ग्रामीण भागातील जनतेने केली आहे. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages