समाज कल्याणच्या शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला सुरुवात - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, May 25, 2026

समाज कल्याणच्या शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला सुरुवात



अमरावती, दि. २६ : सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनातर्फे सर्व सोयी-सुविधा पूर्णपणे मोफत पुरविल्या जातील.

शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये इयत्ता आठवी ते दहावी (शालेय), कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट डाऊनलोड करावी. डाऊनलोड केलेली प्रिंट घेऊन संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

मुलांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. १, २, ३ आणि निंभोरा), संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह (निंभोरा), तसेच मुलींसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह (कॅम्प, जेल रोड युनिट क्र. ४, आणि १२५वी जयंती वसतिगृह) प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. तसेच तालुकास्तरावरही आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांसाठी अर्ज संबंधित वसतिगृहात सादर करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शालेय अभ्यासक्रम आठवी ते दहावीसाठी ३० जून, कनिष्ठ महाविद्यालयासाठी १५ जुलै, अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १५ जुलै, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्रपणे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी ०७२१-२६६१२६१ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा समाज कल्याण आयुक्त कार्यालयात संपर्क साधावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages